दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर, एक दिवसात ९३,२४९ नवे रुग्ण

0
72
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशात रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत तब्बल ९३ हजार २४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. १९ सप्टेंबरनंतर देशात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे.  या आकडेवारीबरोबरच भारत दररोज सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. तेथे ६६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढून आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तेथे ४१ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

भारतात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळीवर होता. ९ सप्टेंबरनंतरचे सलग दहा दिवस देशात ९० हजार ते ९८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे आता देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता पहिल्या लाटेपेक्षाही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता देशात दररोज एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ५१३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ कोटी २४ लाख ८५ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १ लाख ६४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६ लाख ९१ हजारांहून अधिक सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी एकाच दिवसात ८९ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. मागील वर्षीच्या २० सप्टेंबरनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी होती. २० सप्टेंबरला देशात ९२ हजार ६०५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्य आहे. शनिवारी महाराष्ट्रात ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २७७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याची राजधानी मुंबईत शनिवारी ९ हजार ९० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

देशात दररोज आढळणाऱ्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकट्या महाराष्ट्रात साठ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना प्रभावित टॉप १० जिल्ह्यांमध्ये ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत आठ राज्यांत ८१.४२ टक्के कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश ही ती आठ राज्ये आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक आक्रमक असेल का?  या धास्तीने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. थोडीशी ढिलाई देताच कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावल्याचे जगातील अनेक देशात पहायला मिळाले आहे. अमेरिका आणि युरोप ही त्याची उदाहरणे आहेत. अमेरिकेत कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा दररोज जवळपास ७८ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. परंतु दुसरी लाट प्रचंड वेगाने आली. दुसऱ्या लाटेत तेथे दररोज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा प्रदीर्घ काळ राहिली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वशक्तीनिशी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभेला आलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले. लोक विनामास्क त्यांच्या प्रचारसभांत सहभागी झाले होते.

आता भारतात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचंड गर्दीच्या प्रचारसभा घेत आहेत. त्यांच्याही प्रचारसभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. हजारोंच्या संख्येने लोक विनामास्क मोदी-शाहांच्या प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट किती भयावह असेल, हे नजीकच्या काळात दिसून येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा