औरंगाबादेत जमावबंदी, इयत्ता नववीपर्यंतच्या शाळा बंद; विनामास्क फिरणाऱ्यांची खैर नाही!

0
1142

औरंगाबादः औरंगाबादेत कोरोना विषाणूच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले असून या संसर्गाला अटकाव करण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी आणि इयत्ता ११ वीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता १० वी व १२ वीतील विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध राहणार आहेत.

प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, आणि मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. उपस्थिती होती.

महापालिका क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते ९ वी व ११ वीतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास बंदी राहील. त्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाईल. इयत्ता १० वी व १२ वीतील विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल. मात्र ज्या विद्यार्थ्याला यायचे नसेल त्यांना ऑफलाइन शिक्षण देण्याचीही व्यवस्था शाळांनी करायची आहे. इयत्ता ५ वी ते ९ वीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत यायचे असेल तर पालकांचे परवानगी पत्र द्यावे लागेल. याबाबत शाळेने निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान शाळेतील सर्व स्टाफला येण्यास मुभा राहील. हे आदेश २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे पांडेय यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती गर्दी न करता साजरी करावी, मिरवणूका काढू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केले. याबाबत विविध संघटनांसोबत प्रशासनाची बैठक झाली असून यात संघटनांनी सर्व नियम पाळून शिवजयंती साजरी करणार असल्याचे आश्वासन दिले. नागरिकांनीही शिवाजी महाराजांना अभिवादन करताना गर्दी करू नये, मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

 कोणीही यात गाफील राहू नये. बाजारपेठा, भाजी मंडई, मॉल्स, आदी गर्दीच्या ठिकाणी नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असून, कोणालाही सौम्य लक्षणे आढळ्यासदेखील स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. औद्योगिक संस्थांनीही आरोग्य विभागाचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे दुसरी लाट आलेली नसली तरी विदेशात असलेली परिस्थिती आपल्याकडे होऊ नये यासाठी वेळीच सजग राहण्याचे डॉ. गव्हाणे यांनी केले.

शहरात विनामास्क फिरणार्‍या लोकांवर अंकुश घालण्यासाठी मनपातर्फे झोननिहाय ३५ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांनी आतापर्यंत १८ हजार विनामास्क लोकांकडून १ कोटींचा दंड वसूल केला आहे. गुरुवारी एका दिवसात एक हजार लोकांना प्रत्येकी ५०० रुपये दंड केलेला आहे.

…अन्यथा संचारबंदी लावणारः लोक मास्कचा वापर करत नाही. यामुळे कोरोना वाढीस लागला आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाने नियम कटाक्षाने पाळावेत, अन्यथा नाईलाजाने रात्रीची संचारबंदी लावावी लागेल. परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर गरज पडल्यास दिवसाच्या संचारबंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी  दिला.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन डॉक्टर पॉझिटिव्हः शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, पहिला डोस घेतलेल्यांपैकीच दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. या डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या चौदा दिवसानंतर शरिरात पूर्णपणे अँटीबॉडी तयार होते. मात्र या डॉक्टरांमध्ये अद्याप ती झाली नव्हती, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी माहिती देताना सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले मुलीचे रिसेप्शनः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त २६ फेब्रुवारी  रोजी हॉटेल अजंता ॲम्बेसेडर येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी हा नियोजित कार्यक्रम रद्द केला असून या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवलेल्या सर्वांना आपापल्या घरूनच शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा