राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाइनच होणार, शुक्रवारपासून अंमलबजावणी

0
70
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील  वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या सर्व वर्षांच्या परीक्षा पूर्णतः ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला असून या निर्णयाची अंमलबजावणी उद्या शुक्रवारपासूनच केली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

आतापर्यंत विद्यापीठांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले होते. मात्र आता १३ अकृषी विद्यापीठांच्या सर्व अभ्यासक्रमाच्या आणि सर्व वर्षांच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 कोरोना परिस्थिती आणि नव्याने लावलेल्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना ज्या काही तांत्रिक अडचणी येतील, त्यांची पूर्तता करण्याची सूचना मी कुलगुरूंना केली आहे, असे सामंत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या, शुक्रवारपासून होणार आहे. आता प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होतील, असे सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा