औरंगाबादेत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा, दुपारी ३ वाजेनंतर संचारबंदी

0
258

औरंगाबादः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध रुग्णसंख्या घटत असलेल्या जिल्ह्यात शिथील करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर आज औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी १ जून ते १५ जून या कालावधीसाठी नवीन आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्तची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यकसेवा वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. सर्व शॉपिंग सेंटर्स आणि शॉपिंग मॉल्स मात्र बंदच राहणार आहेत. या दुकानांनी दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व हिशेब करून दुकाने पूर्णतः बंद न केल्यास ती सील केली जातील, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

अत्यावश्यक सेवेतील दुकाने: औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयातील अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

बँक: औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात सर्व बँका कामाचे सर्व दिवससुरु राहतील.

अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर दुकानेः औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.  सर्व  शॉपिंग सेंटर्स आणि शॉपिंग मॉल्स बंद राहतील.

हॉटेल, बार, मद्यविक्री दुकानांतून केवळ पार्सल/ घरपोच सेवा: रेस्टॉरंट/हॉटेल,,बार व मद्य विक्रीची दुकाने ही फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी १६ एप्रिल आणि १२ मेच्या आदेशानुसार सुरु राहतील. औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तु व सेवा तसेच, अत्यावश्यक व्यतिरिक्त यांची घरपोच सेवा सुरु करण्यास मुभा राहील.

दुपारी ३ वाजेनंतर संचारबंदीः औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात दररोज दुपारी 3.00 वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण/ अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णपणे प्रतिबंध (संचारबंदी) राहील. घरपोच सेवा देण्यास यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी राहिल. 

शेतीशी संबंधित दुकाने आठवडाभर खुली: कृषि संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

…अन्यथा दुकाने सील करणारः ज्या आस्थापना/दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे त्यांनी दुपारी २.३० पर्यंत अथवा तत्पूर्वी अनिवार्य सर्व हिशोब व इतर कार्यवाही पूर्ण करुन दुकाने/आस्थापना बंद करावी. या संबंधी उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सदरील दुकाने/आस्थापना कोरोना महामारी संपेपर्यंत सील करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीः औरंगाबाद महानगरपालिकासह संपूर्ण जिल्हयात सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक /कोरोना विषयक कामकाज करणा-या कार्यालयाव्यतिरिक्त ) २५% अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील.

मालवाहतूक सेवा व इतर: मालवाहतूक व मालाचा पुरवठ्याशी संबधित दुकानदार/आस्थापनेस करण्याकरिता वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र अशा दुकानदार/आस्थापना यांनी कोणत्याही परिस्थितीत माल साठवणूक करतांना या कालावधीत मालाची विक्री करु नये, मालाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सील केलेली दुकाने कधी उघडणार?: यापूर्वी कोरोना महामारीमध्ये नियमबाहय कृतीबद्दल बंद केलेल्या आस्थापना त्यांची सुनावणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच उघडल्या जातील.  या सुनावणीचे अधिकार सहाय्यक आयुक्त, कामगार, सहाय्यक आयुक्त, अन्न व सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकारी यांना राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा