२५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस द्याः मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदींना पत्र, दीड कोटी डोसची मागणी

0
50
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वांनाकोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री श्रीउद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांची मागणी प्रधानमंत्र्यांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो. त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणतात.  कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पाउले उचलत आहे. राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा,  उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोरोनासाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरवली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोरोना लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून ४ एप्रिल रोजीपर्यंत ७६.८६ लाख जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४.६२ लाख जणांना लस दिली आहे, अशी आकडेवारीही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिली आहे.

दीड कोटी डोस द्याः लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती करून मुख्यमंत्री म्हणतात की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ ३ आठवड्यात ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरिता दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

आधी जीवन मग उपजीविकाः केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा