व्हीडिओः औरंगाबादेत कोरोना कारवाईत भाजप नेत्यांच्या खोडा, मनपा पथकाला बेदम मारहाण

0
870

औरंगाबादः  औरंगाबाद शहरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या मनपा पथकालाच आडकाठी करून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी गुलमंडीवर घडला. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या पथकाला मारहाण केली.

गुलमंडीवर मास्क नसलेल्या एका विद्यार्थ्याला अडवून महापालिकेच्या पथकातील कर्मचारी दंडवसुली करत असताना गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनी या पथकातील कर्मचाऱ्यांनाच मारहाण केली. गुलमंडीवर विनामास्क नागरिकांवर कारवाई सुरू असताना पथकाने एका विद्यार्थ्याला अडवले. विद्यार्थ्याने मास्क घातलेला नव्हता. तेथे उपस्थित असलेले भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाच्या कारवाईत हस्तक्षेप करत त्या विनामास्क विद्यार्थ्याला सोडून द्या, असे पथकाला बजावले. परंतु पथकाने नियमानुसार दंड आकारावाच लागेल, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणीही तेथे आले. त्यांनीही त्या विनामास्क विद्यार्थ्याला सोडून देण्यास सांगितले. परंतु विनामास्क आढळल्यास दंड आकारण्याचे आदेश असल्याचे सांगत पथकातील कर्मचारी दंडवसुलीवर ठाम राहिले.

विनामास्क विद्यार्थ्याकडून दंडवसुलीचे निमित्त गुलमंडीवरील व्यापाऱ्यांना मिळाले. दुकानात कॅरिबॅग ठेवल्यामुळे मनपा पथकाकडून आकारलेल्या दंडाचा राग त्यांनी या पथकावर काढला आणि पथकाला बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना सुरेंद्र कुलकर्णी आणि किशनचंद तणवाणीही तेथेच होते. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पोलिसांची टोलवाटोलवीः व्यापाऱ्यांकडून मारहाण झालेल्या या पथकातील कर्मचाऱ्यांनी सिटी चौक पोलिस ठाणे गाठले. गुलमंडी हा भाग सिटी चौक पोलिस ठाण्याच्याच हद्दीत येतो. तरीही मनपा पथकातील या कर्मचाऱ्यांना तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. औरंगाबादेतील कोरोनाचे संकट गडद होत असताना असे प्रकार घडत असतील तर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईल कसा?  हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा