राज्यात जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात २ लाख कोरोना रूग्ण, ८० हजार रूग्ण मृत्यूची शक्यता!

0
275

मुंबईः महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कोरोनाची तिसरी लाट धडकू पाहते आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या सध्या ज्या वेगाने वाढत आहे, ती पाहता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात कोरोनाचे २ लाख सक्रीय रूग्ण असतील आणि जवळपास ८० हजार रूग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ३१ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात हा इशारा दिला आहे. ओमीक्रॉन विषाणूमुळे सौम्य आजार होतो, या सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर आधारित भ्रमात राहू नका. लसीकरण मोहीम अधिक जोमाने राबवा. जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालावरून अद्यापही ७० केसेसमध्ये डेल्टा व्हेरिएंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हानिहाय ही आकडेवारी भिन्न आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचाः वॉक-इन-इंटरिव्ह्यूसाठी अर्जच नसलेल्या दोघांची केली सहायक प्राध्यापकपदी निवड, एक जण कायम

दक्षिण आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढकत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी आढळून येत आहे. असे ओमीक्रॉन विषाणूच्या स्वरूपामुळे होत आहे की लसीकरणामुळे याबाबत वैज्ञानिकांची मते भिन्न आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लस उपलब्ध नव्हती. ज्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा व्यक्तींमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलाना रूग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण मोठे आहे, हे लक्षात ठेवा, असेही या पत्रात म्हटले आहे. लसीकरण न झालेल्या लोकांना या लाटेत अधिक धोका आहे, हे लक्षात घ्या, असेही या पत्रात म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः  शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 तिसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल. त्यापैकी १ टक्का जरी मृत्यूदर गृहित धरला तरी जर तिसऱ्या लाटेत ८० लाख कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले तर जवळपास ८० हजार रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट किंवा ओमीक्रॉनची लाट सौम्य असेल आणि त्यात मृत्यू होणार नाहीत, या भ्रमात राहू नका. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा आणि लोकांचे जीव वाचवा, असेही प्रदीप व्यास यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा