भाजपः हिंदूविरोधी ‘तडसां’चा सत्ताधारी कळप!

0
153

कुंभमेळ्यात साधू संताचे झालेले बरे वाईट म्हणजे केंद्र सरकारने घडवून आणलेला खूनच म्हणावे लागतील. कारण केंद्राला २०२० पासून माहीत आहे की, अशा प्रकारच्या मोठ्या धार्मिक आयोजनातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून लोकांचे मृत्यू होऊ शकतात. ही सगळी परीस्थिती माहीत असतांनाही केंद्र सरकारने केलेले खून म्हणजे केंद्राचे हिंदुत्वविरोधी धोरण आहे. हिंदुत्वाच्या नावाने हिंदूंचेच जीव घेणारा भाजप हा पक्ष म्हणजे मतपेटीच्या राजकारणातल्या जंगलातला तडसांचा कळप आहे. ज्याला त्याचे पोट भरण्यासाठी केवळ भक्ष्य हवे असते. मग ते भक्ष्य कुणीही का असेना..!

ॲड. जयेश वाणी

गोष्ट क्रमांक १: उझबेकिस्तानी कारतलब खान नावाचा सरदार शाईस्तेखानाच्या आदेशाने रायबाघन या महिला सरदाराला सोबत घेऊन कोकण जिंकण्यासाठी उंबरखिंडीचा घाट उतरुन खाली येत होता. नेतोजी पालकरांच्या सोबत स्वतः छत्रपती महारांजांनी मोजक्याच मावळ्यांसह कारतलब खानावर उंबरखिंडीत असा काही हल्ला चढवला की त्याला शरण यावे लागले. महाराजांनी ठरवले असते तर त्यांना कुणाही दुसऱ्या एखाद्या सरदाराला सांगुन ही मोहिम फत्ते करता आली असती. अगदी शाहीस्तेखानाला धडा शिकवायलाही त्यांनी दुसऱ्या कुणाला पाठवले असते तर कुणीही हसत हसत महारांजांसाठी तळहातावर प्राण घेऊन लढले असते. पण महाराजांनी स्वतः आपल्या कृतीतून शौर्याचा आदर्श निर्माण केला.

गोष्ट क्रमांक २: पश्चिम बंगालमध्ये फाळणीनंतर प्रचंड आक्रोश निर्माण झालेला. हिंदू मुसलमानांच्या धार्मिक दंगलींनी पश्चिम बंगाल होरपळून निघाले होते. दंगे थाबवणे प्रशासनाच्या हाता बाहेर गेलेले असतांना स्वतः महात्मा गांधी तिथे पोहोचले. मुसलमान आणि हिंदू दंगेखोरांपुढे उभे राहून ते दुसऱ्या समुदायाला पाठीमागे घेत दंगेखोरांना म्हणायचे की यांना मारण्याआधी मला मारुन पुढे जा… हिंदू असो किंवा मुसलमान गांधींसमोर चवताळलेला समुदाय आपल्या हातातली शस्त्रे खाली टाकून शरण यायचा. कुणीतरी गांधीजींच्या या आत्मबलाला त्यांचा नैतिक अधिकार म्हणाले. याच नैतिक अधिकारामुळे बिनडोक दंगेखोर समुदाय त्यांना शरण जायचा.

गोष्ट क्रमांक ३:  मोठ्या माणसांबाबत एक गोष्ट हमखास सांगितली जाते, ती म्हणजे कुणा तरी मोठ्या माणसाकडे एक माणूस त्याच्या मुलाला घेऊन येतो आणि या महापुरुषाला सांगतो की, माझा मुलगा गुळ/ साखर खूप खातो. महापुरुष त्याला आठ दिवसांनी परत बोलावतात आणि आठव्या दिवशी मुलाला म्हणतात बाळा साखर नको खात जाऊ. एवढेच वाक्य ऐकून मुलाचा बाप म्हणतो, हेच सांगायचे होते तर आठ दिवसांनी का बोलावले? तो महापुरुष म्हणतो मलाही गुळ/ साखर खायची सवय होती आणि मी आठ दिवस गुळ/ साखर खाणे बंद केले म्हणून मला या मुलाला सांगायचा नैतिक अधिकार मिळाला…

या तिन्ही गोष्टी आज सांगण्याची गरज आणि औचित्य काय तर या तिन्ही गोष्टीतून मला इतकेच सांगायचेय की, खऱ्या नेत्याची ओळख त्याच्या नैतिकअधिकारातून आणि त्याने कृतितून निर्माण केलेल्या आदर्शातून होत असते. काल अशी काही घटना घडली की माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.  प्रधानमंत्र्यांनी कुंभमेळा संपवण्याची विनंती (त्यांनीच रिक्वेस्ट शब्द वापराल ट्विटमधे) करुनही कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरुपात होणारच आहे. ज्या देशात कालपरवापर्यंत कुणीही आमंत्रण दिले नसता लाखो लोक कुंभमेळ्यासाठी जमा झाले. त्या देशात प्रा तिनिधिक कुंभमेळ्यात किती लोक असतील याची कल्पनाही करवत नाही? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमभमेळा संपवा, अशी घोषणा करण्याचा नैतिक अधिकार निवडणूक प्रचारासाठी लोखोंच्या जनसभा आणि रॅली घेणाऱ्या व्यक्तिला राहूच कसा शकतो? म्हणजे गोष्ट क्रमांक ३ मधल्याच्या अगदीविरुध्द मी साखर सोडणार नाही पण तू सोड, असे सांगण्यासारखे नाही का? जरा लॉकडाऊन उघडले नाही तर पश्चिम बंगालमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन बांग्लादेश दौरा उरकून घेणाऱ्या मोदींना आता लोकांना ‘अनावश्यक प्रवास टाळा’ हे सांगण्याचा नैतिक अधिकार राहीलाय का?

खरे तर यावर्षीच्या कुंभमेळ्याची गरज काय होती? दर बारा वर्षांनी येणारा हा काळ असला तरी आजच्या सारखी महामारी शेकडो वर्षांतून एकदाच येते. मागच्या वर्षी याच दिवसांमधे तबलिघी समाजाच्या मुस्लिमांनी कोरोना पसरवला म्हणून भाजपच्याच लोकांनी विखारी प्रचार केला होता ना? मग तश्याच प्रकारचा धार्मिक समारोह घेणे, त्या समारोहाचे समर्थन करणे नैतिकतेला धरुन आहे?

जगाच्या पाठीवरची कुठलीच लोकशाही केवळ कायद्यांच्या भरवशावर टिकत नाही. कायदे तर जर्मनी, इटली, लिबीया, सिरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान यासारख्या देशातही होते आणि आहेत. पण तिथे लोकशाही टिकली नाही/ टिकत नाही. कारण लोकशाही टिकते ती लोकशाहीतल्या नेत्यांच्या नैतिक कर्तृत्वावर. तिथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांवर आणि परंपरांवर. आपल्या देशात आजच्या घडीला याच आदर्श वर्तणुकीचा आणि उच्च परंपरांचा अभाव स्पष्ट पहायला मिळतो आहे.

भारतीय संघराज्याच्या राज्यघटनेतील आर्टिकल २५ प्रमाणे आपल्या सगळ्यांनाच आपापल्या धार्मिक विधी परंपरा पाळण्याचा, जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण या अधिकाराला काही बंधने देखील आहेत. रतिलाल पानचंद गांधीविरुध्द बॉंम्बे राज्य या खटल्याच्या निकालात १९५४ साली सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने स्पष्टपणे म्हटले की, आर्टिकल २५ च्या धार्मिक स्वातंत्र्याला काही बंधने देखील आहेत. आर्टिकल २५(१)प्रमाणे धार्मिक परंपरा पाळतांना पब्लिक ऑर्डर (सरकारी आदेश), मोरॅलिटी (नैतिकता) आणि हेल्थ (आरोग्य) आणि राज्यघटनेच्या इतर नियमांच्या (प्रोव्हिजन) अधीन राहूनच आर्टिकल २५ चा मूलभूत अधिकार वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशातील ‘आरोग्य’ हे बंधन सरकारला लागू करता आले नाही का? मतपेटीची चिंता कुणाच्या आयुष्यापेक्षा मोठी असू शकते असे वाटणारी माणसे सैतानाची औलादच असायला हवीत.

भाजपचे एक प्रवक्ते अतुल भातखळकरांना पालघरच्या साधूच्या हत्येची वेदना जाणवते(?), गावकऱ्यांनी दरोडेखोर असल्याच्या संशयाने केलेल्या हल्ल्यात राज्य सरकारचा कुठलाही संबंध नसतांना राज्य सरकारला जबाबदार धरण्यात भातखळकर धन्यता मानतात. पण कोरोना काळात कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी अनेक साधूंना कोरोनाची बाधा होऊन त्यंच्या जिवीतास धोका होऊ शकतो याची पूर्ण माहिती व ज्ञान असतांनाही कुंभमेळ्याला केंद्र सरकार परवानगी देते. या मेळ्यात कोरोनामुळे निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपील देव यांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक साधू कोरोनाबाधित झाले आहेत. आता भातखळकरांसारखे अतार्किक प्रवक्ते केंद्राच्या धोरणाला हिंदू विरोधी म्हणण्याचे धाडस दाखवतील का?  

कुंभमेळ्यात साधू संताचे झालेले बरे वाईट म्हणजे केंद्र सरकारने घडवून आणलेला खूनच म्हणावे लागतील. कारण केंद्राला २०२० पासून माहीत आहे की, अशा प्रकारच्या मोठ्या धार्मिक आयोजनातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून लोकांचे मृत्यू होऊ शकतात. ही सगळी परीस्थिती माहीत असतांनाही केंद्र सरकारने केलेले खून म्हणजे केंद्राचे हिंदुत्वविरोधी धोरण आहे. हिंदुत्वाच्या नावाने हिंदूंचेच जीव घेणारा भाजप हा पक्ष म्हणजे मतपेटीच्या राजकारणातल्या जंगलातला तडसांचा कळप आहे. ज्याला त्याचे पोट भरण्यासाठी केवळ भक्ष्य हवे असते. मग ते भक्ष्य कुणीही का असेना..!

लेखकाचा संपर्कः ९१६७६०७६६६

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा