औरंगाबादेत कोरोना सेंटरमध्येच महिला रुग्णावर डॉक्टरकडून बलात्काराचा प्रयत्न

0
615
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना सेंटरमध्येच एका आयुष्य डॉक्टरने कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. महापालिका प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पदमपुरा येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वीच ही पॉझिटिव्ह महिला दाखल झाली होती. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या आयुष डॉक्टरने त्या महिला रुग्णाचा मोबाइल क्रमांक घेतला. तो डॉक्टर मोबाइलवर अवेळी फोन करत होता, असा आरोपही या महिला रुग्णाने केला आहे. मंगळवारी मध्यरात्री या आयुष डॉक्टरने या महिला रुग्णाला डिस्चार्ज देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली. मात्र त्या महिला रुग्णाने नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

आयुष डॉक्टर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असताना या कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाने आरडाओरड केली. त्यामुळे कोरोना सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकारानंतर महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी कोरोना सेंटरमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली आणि डॉक्टर बचावला.

हा आयुष डॉक्टर डिस्चार्ज देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करत आहे. नकार दिल्यामुळे तो जबरदस्ती करत असल्याची माहिती महिला रुग्णाने नातेवाईकांना दिल्यानंतर ते कोरोना सेंटरमध्ये घुसले आणि त्यांनी डॉक्टरला धुवून काढले. या प्रकरणी पोलिसांत अद्याप तक्रार देण्यात आली नसली तरी महिलेच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बुधवारी हा प्रकार महापालिका प्रशासनाला कळल्यानंतर प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा