औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी दर २.५ टक्क्यांवर, मनपा स्वतंत्र घटक धरून संपूर्ण अनलॉक शक्य

0
172
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच गटांमध्ये अनलॉकचे आदेश जारी केल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्बंध शिथिलतेचा निर्णय घेईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता याबाबतची बैठक होणार असून औरंगाबाद महानगरपालिका हा स्वतंत्र प्रशासकीय घटक असेल असे राज्य सरकारने आधीच स्पष्ट केल्यामुळे औरंगाबाद शहराचा अडीच टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेले २०.३४ टक्के ऑक्सीजन बेड्स पाहता औरंगाबाद शहर पहिल्या स्तरात गृहित धरून संपूर्ण अनलॉक केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 राज्य सरकारने शुक्रवारी रात्री जारी केलेल्या आदेशानुसार औरंगाबादसह बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल. ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

राज्यभरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल. प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्बंध शिथिलतेसाठी पाच गट ठरवण्यात आले असून ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५  टक्क्यापेक्षा कमी व्यापलेले असतील, असे पहिल्या गटासाठीचे निकष आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचा आठवडी पॉझिटिव्हिटी दर ५.३८ टक्के आहे. मात्र औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी दर अडीच टक्क्यांवर आहे आणि शनिवारपर्यंत जिल्ह्यातील २०.३४ टक्के ऑक्सीजन बेड्स भरलेले आहेत. ही परिस्थिती पाहता औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र हा स्वतंत्र प्रशासकीय घटक धरून आज होणाऱ्या बैठकीत आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार निर्बंध शिथील केले जातील, अशी शक्यता आहे.

आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, महापालिका प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र आणि औरंगाबाद जिल्हा असे दोन स्वतंत्र प्रशासकीय घटक धरूनच निर्बंध शिथिलतेचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र निर्बंध शिथिलतेच्या पहिल्या गटात येईल आणि शहरात संपूर्ण अनलॉक केले जाण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र काही निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारने जारी केलेल्या निकषानुसार ग्रामीण भागात काहीशी सूट मिळू शकते तर औरंगाबाद शहरातील निर्बंध मात्र काही अटींच्या अधीन राहून उठवले जाऊ शकतील, अशी शक्यता आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचा ३ जून रोजीचा पॉझिटिव्हिटी दर ५.३८ टक्के असला तरी दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर मात्र झपाट्याने खाली येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २८ मे रोजी ६.८५ टक्के होता. २९ मे रोजी तो ६.७९ टक्क्यांवर आला. त्यानंतर ३० मे रोजी ४.९६ टक्के, ३१ मे रोजी ६.८६ टक्के, १ जून रोजी ५ टक्के, २ जून रोजी ३.४३ टक्के आणि ३ जून रोजी तो ३.७५ टक्के होता. निर्बंध शिथिलतेचा विचार करताना हे घटकही लक्षात घेतले जातील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा