मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहूः मुख्यमंत्री

0
142
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोरोना सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राज्याला ऑक्सीजनची नितांत गरज असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याही काल आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही, असेही ठाकरे म्हणाले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे. त्यात पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन  केले. कोरोनाचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनची नितांत गरज आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे, अशी या लढाईत शक्य होईल, तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

या बैठकीस उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा,  संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशिष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी होते.  यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आपल्या सुचना मांडल्या तसेच उद्योगपतींना कोविडविषयक सुविधा उभारण्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे सांगितले. यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

कोरोनाची किती लाटा येईल की नाही ते आज सांगू शकत नाही मात्र आता राज्यातील उद्योगांनी सुद्धा येणाऱ्या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे.  उदाहरणादाखल कोविड सुसंगत कार्यप्रणाली स्वीकारणे, चाचणी व लसीकरणाच्या सुविधा उभारणे, कामगार व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष यंत्रणा निर्माण करणे, आपल्या परिसरात विलगीकरण व्यवस्था उभारणे तसेच बेड्स उपलब्ध ठेवणे, वर्क फ्रॉम होमची यंत्रणा विकसित करणे, कामगारांच्या कामाच्या वेळांत तसे अनुरूप बदल करणे अशा सूचना  मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

गेल्या वर्षभरात जगातील इतर देशांनी कोरोनाच्या काही लाटा अनुभवल्या आहेत, त्यांनी वेळोवेळी निर्बंधही लावले आहेत. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घ्यावी. पुढे देखील या लॉकडाऊन किंवा निर्बंधांमुळे उद्योगांना झळ सोसावी लागू नये अशी काळजी आपण घेतली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

उद्योगांचा टास्क फोर्स तातडीने स्थापणारः राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे. तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी  उद्योगांचा एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावा, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले.

बेड्स, चाचणी केंद्रांसाठी उद्योगांचा पुढाकारः बैठकीत राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सीजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात  येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढवणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढवणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील असेही सांगण्यात आले.

मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्तः ऑक्सीजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सीजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्णसंख्या पाहता आणखी ऑक्सीजनची गरज भासत असून आपण प्रधानमंत्र्याही तसे कळवले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होता मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही. मात्र केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सीएसआरमधून शिवभोजन थाळीसारखे उपक्रम राबवाः राज्य सरकार या कोरोना काळात गरीब व दुर्बल घटकांसाठी मदतीचा  हात देत आहे. शिवभोजन जन थाळी हि अनेक गरिबांचे पोट भरते. आपल्या सीएसआरच्या माध्यमातून असे काही उपक्रम आपल्या उद्योगांच्या परिसरातील वसाहती व गावांसाठी राबवले तर समाजिक उत्तरदायीत्व निभावले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी टास्क फोर्सचे डॉक्टर शशांक जोशी यांनी देखील या संसर्गाच्या वाढत्या प्रभावाविषयी माहिती दिली.

ऑक्सीजन तयार कराः तुलनेने मृत्यू दर कमी असला तरी रुग्ण  दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर आला आहे. हे सांगून ते म्हणाले की, आपण दहा लक्ष लोकसंख्येत दररोज सुमारे ३ लाख चाचण्या करीत आहोत. उद्योगांनी त्यांच्या आवारात नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवेतील ऑक्सीजन शोषून उत्पादन करणारे छोटे प्रकल्प सुरु करावेत. तसेच उत्पादित ऑक्सीजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी द्यावा असे डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.

उद्योग उपलब्ध करून देणार ऑक्सीजनः सर्व उद्योगपतीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जेएसडब्ल्यू , महिंद्र, गोदरेज, बजाज, रिलायन्स, टाटा, ब्ल्यू स्टार,एल एंड टी , इन्फोसिस,  कायनेटिक इंजिनीअरिंग यांच्या प्रतिनिधींनी बोलताना विशेषत: ऑक्सिजन उपलब्धता करून देण्यात येईल तसेच त्यांच्या उद्योगांच्या परिसरात चाचणी केंद्रे उभारणे, लसीकरण मोहिमा घेऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सुरक्षित करणे यासाठी तातडीने पावले उचल आहोत असे आश्वासन दिले. अनेक उद्योगांनी त्यांच्या परिसरात विलगीकरण सुविधा उभारत असल्याचेही बैठकीत सांगितले. 

औद्योगिक परिसरात सुविधा उभारणे सुरुः औद्योगिक वसाहतींमध्ये यादृष्टीने सुविधा उभारण्यात येत आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील दिली. उद्योगांना उभारायची लसीकरण केंद्रे ही वैद्यकीय जागेत नसल्याने तातडीने परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले तसेच गृहनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी त्यांचे पूर्ण झालेले गृहनिर्माण प्रकल्प विलगीकरण केंद्रांसाठी द्यावेत, असे आवाहन केले.    

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा