सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा लांबणीवर

0
87

नवी दिल्लीः देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रचंड वेगाने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्दा करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीबीएसईने आज हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे देशातील लाखो विद्यार्थी- पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. महाराष्ट्र सरकारने राज्य बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर सीबीएसईला पत्र लिहून परीक्षांच्या तारखांबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीबीएसईला दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना केली होती.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२४ तासांत देशात १ लाख ८४ हजार रुग्णः दरम्यान, देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात १ लाख ८४ हजार ३७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १ हजार २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १३ लाख ६५ हजार ७०४ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १ लाख ७२ हजार ८५ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा