सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा अखेर रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0
134
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः सीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसई बोर्डाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेबाबत मंगळवारी सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोर्डाच्या बैठकीत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शक्य असलेल्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. आता केंद्र सरकार सीबीएसई बारावीच्या परीक्षेबाबत ३ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपले म्हणणे सादर करणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार होती. परंतु सध्या ते एम्समध्ये उपचारासाठी दाखल आहेत. १ जूनपर्यंत बारावीच्या परीक्षांबाबत सर्वसंम्मत आणि सर्वंकष निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाचे शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांकडून परीक्षांबाबत सूचनाही मागवल्या होत्या.

 राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकार तीन पर्यायांवर आले होते. त्यापैकी पहिला पर्याय होता फक्त प्रमुख विषयांची परीक्षा घेण्याचा. दुसरा पर्याय होता वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नपत्रिका काढून नव्या फॉर्मेटमध्ये परीक्षा घेण्याचा आणि तिसरा पर्याय होता मागील तीन शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून त्यांचे मूल्यमापन करण्याचा.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने १४ एप्रिल रोजीच दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. याचबरोबर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणाही करण्यात आली होती.

मोदींची घोषणाः आज झालेल्या बैठकीनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी बारावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. भारत सरकारने  सीबीएसई बोर्डाची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापक सल्लामसलत केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल आणि आपल्या युवांचे आरोग्य तसेच भवितव्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा