औरंगाबादेतील कोरोना संसर्गाची साखळी कशी तोडायची?, केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना

0
84

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने प्रभावी नियोजन करणे गरजेचे असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या भागातील कन्टेनमेंट झोनमध्ये वाढ करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख आणि अत्यावश्यक आरोग्यसेवा संचालक डॉ.रविन्द्रन यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोरोना स्थिती, उपचार सुविधांचा केंद्रीय पथकाव्दारे आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. रविंद्रन बोलत होते. पथकात सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा दर ही गंभीर बाब असल्याचे सांगून हा संसर्ग कमी करण्यासाठी सामाजिक स्तरावर, रुग्णालय आणि प्रशासन स्तरावर प्रतिबंधात्मक उपायात वाढ करण्याचे आवश्यक असल्याचे रविंद्रन यांनी सूचित केले. लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. मास्कचा वापर जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तितक्या प्रमाणात संसर्ग कमी होईल. त्यामुळे लोकांना मास्कचा वापर बंधनकारक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांनवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. रविंद्रन यांनी दिले. चाचण्यांचे प्रमाण वाढवून कन्टेनमेंट झोन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करावे. त्याठिकाणी संपर्कातील व्यक्तीचा शोध, चाचण्या, उपचार, रुग्ण लवकरात लवकर शोधण्यावर भर द्यावा. त्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत डॉक्टर, आशा स्वयंसेविका, निरीक्षक यांना प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर इतर सर्व भागात ताप तपासणी केंद्रातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संशयित रुग्णांच्या चाचण्या वेळेत करुन घ्याव्या. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका आणि त्यापासूनच्या बचावासाठी नियमावलीचे पालन याबाबत जनजागृती करावी, अशा सूचनाही रविंद्रन यांनी दिल्या.

संस्थात्मक विलगीकरणावर भरः औद्योगिक परिसर, गर्दीची ठिकाणे अतिजोखमीच्या भागात चाचण्यांवर भर द्यावा. एकाच कुटुंबात अधिक बाधितांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे गृह विलीगीकरण ऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. पुरेशा सुविधा असल्याशिवाय कुणालाही गृह विलगीकरणाची परवानगी देऊ नये. वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचार सुविधा, व्हेंटिलेटर व्यवस्था, ऑक्सीजन उपलब्धता या सर्व बाबी सज्ज ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाची गती वाढवाः घाटी रुग्णालयाने उत्तमरित्या उपचार सुविधा तयार ठेवल्याबद्दल पाहणी पथकाने समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजाणी करून लसीकरणाची गती आणि प्रमाण वाढवावे. जेणे करुण सहव्याधी असणारे आणि ज्येष्ठांमध्ये संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे या वयोगटातील लोकांचे लसीकरण पूर्ण क्षमतेने करण्याची सूचना त्यांनी केली. डॉ. खापर्डे यांनी ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही सूत्री वापरुन संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी उपायांसह सज्ज राहण्याचे सूचित केले.

दोन पद्धतीचे कंटेनमेंट झोनः डॉ. कुलकर्णी यांनी कन्टेनमेंट झोन मध्ये डॉक्टर, आशासेविका खुप चांगले काम करत असल्याचे सांगून मोठे आणि लहान अशा दोन पध्दतीच्या कन्टेनमेंट झोन मध्ये बाधित क्षेत्राची विभागणी करुन प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे सूचित केले. 

मृत्यू झालेल्या प्रकरणांचा अभ्यासः डॉ. आवटे यांनी रुग्णवाढीच्या प्रमाणात नियंत्रणात्मक उपायोजनाचे नियोजन करावे. तसेच मृत्यू झालेल्या प्रकरणांचा अभ्यास करुन ते कसे रोखता येतील यादृष्टीने उपाययोजना राबवण्याचे सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील उपचार सुविधा, अत्यावश्यक सेवांची सज्जता, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, खाटांची उपलब्धता यांसह चाचण्यांची वाढीव तयारी, लसीकरण मोहिमेची अमंलबजावणी  याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनामार्फत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा