राज्यात उद्या रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज जाहीर

0
621
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग खंडित करण्यासाठी उद्या बुधवारी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून १ मेपर्यंत राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात कोणालाही अनावश्यक घराबाहेर पडता येणार नाही. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

राज्यात मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. या काळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

७ कोटी लोकांना एक महिना मोफत अन्नधान्यः अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल.

गरिबांना शिवभोजन थाळी मोफतः राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे. शिवभोजन थाळी सुरू झाली तेव्हा ही थाळी १० रुपयांत होती. कोरोना काळात ती पाच रुपयांवर आणण्यात आली होती. आता ती मोफत दिली जाणार आहे.

निराधार, विधवा, दिव्यांगांना आगाऊ एक हजार रुपयेः संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

१५ बांधकाम कामगारांना १५०० रुपये, घरेलू कामगारांनाही अनुदानः नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फेरीवाले आणि रीक्षाचालकांना एकरकमी १५०० रुपयेः अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी १५०० रुपये देण्यात येणार आहे. या फेरीवाल्यांना बँकांमार्फत त्यांच्या खात्यात जमा होईल.  यात ५ लाख लाभार्थी आहेत. १२ लाख परवानाधारक रीक्षाचालकांना एकरकमी १५०० रुपयांची मदत देणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी कुटुंबांना दोन हजार रुपयेः  आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.

कोरोना उपाययोजनांसाठी ३ हजार ३०० कोटी रुपयेः याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही!

“लपवाछपवी नाही, अपारदर्शकता नाही. आरोग्यसुविधा वाढवणे, लसीकरण वाढवणे यासाठी आपणाला जी संधी लागते, त्यासाठी आपण हे निर्बंध लावत आहोत. हे निर्बंध एकतर्फी नाहीत. केवळ आणि केवळ प्राण वाचवणे यासाठीच हे निर्बंध लावले आहेत. आजपर्यंत सहकार्य केले. आपल्या कुटुंबातील मला मानता, माझ्या माताभगिनींच्या हितासाठी हे निर्बंध लादत आहे. समजून घ्या ही लढाई जिंकायला सैनिक म्हणून सोबत या. राजकारण्यांनाही माझे आवाहन आहे, उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. राजकारण बाजूला ठेवा!”

  • उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री

असे असतील निर्बंधः

हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधाः हॉटेल, रेस्टॉरंट्समधून होम डिलिव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे बंधनकारक असेल. रस्त्यावरील खाद्य पदार्थविक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सुविधेअंतर्गत खाद्यपदार्थ विक्री करता येतील.

पेट्रोलपंप सुरू राहणारः पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. पावसाळी कामेही सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जनावरांसाठीच्या सुविधा देणारी दुकानेही सुरू राहतील.

अनावश्यक फिरण्यावर निर्बंधः पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या काळात कोणत्याही व्यक्तीला अनावश्यक घराबाहेर पडता येणार नाही. तुम्ही कोरोनाला मदत करणार की कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कोरोनायोद्य़ांना आणि सरकारला मदत करणार, हे तुम्हीच ठरवा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा