राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय, मुख्यमंत्री ठाकरे उद्या करणार औपचारिक घोषणा

0
614

मुंबईः राज्यात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता आता कडक लॉकडाऊन करावाच लागेल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या, बुधवारी रात्री ८ वाजेनंतर याबाबतची औपचारिक घोषणा करणार आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर ही माहिती दिली.

 राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता आता संपूर्ण कडक लॉकडाऊन लावावाच लागेल, असे मत सर्वच मंत्र्यांनी या बैठकीत मांडले. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टींवर निर्बंध लावण्यात यावेत, याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या याबाबतची अधिकृत घोषणा करतील, असे परब म्हणाले.

हेही वाचाः SSC Exam: इयत्ता दहावीची परीक्षा रद्द, कडक लॉकडाऊनचाही राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

 राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चालली आहे. राज्यात औषधांचा तुटवडाही जाणवू लागला आहे. मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजनची गरजही भासू लागली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर लोकांना एकमेकांच्या जवळ न येऊ देणे हा त्यावरचा पर्याय आहे, असे परब म्हणाले.

कडक निर्बंध लावूनही कोरोना नियंत्रणात येत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जनता रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील निर्णयाबाबत मुख्यमंत्री ठाकरे उद्या, बुधवारी सविस्तर भूमिका मांडतील. त्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील. रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे. त्यासाठी लागणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांची एक मर्यादा आहे. ते गेले वर्षभर काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. अत्यावश्यक सेवा लोकांना नक्कीच मिळतील. त्यात कुठेही अडचण येणार नाही. पण त्या कशा मिळतील, याची पद्धत ठरवली जाईल, असे परब म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा