राज्यात आरोग्य आणीबाणी, लॉकडाऊन अटळ; मुख्यमंत्री घेणार दोन दिवसांत निर्णय!

0
266
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवालाच प्राधान्य असायला हवे असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात किमान आठ दिवसांचा तरी लॉकडाऊन लावावा लागेल, असे स्पष्ट संकेत दिले. उद्या रविवारी टास्क फोर्सची बैठक होणार असून या बैठकीनंतर उद्या किंवा परवा लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.   

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. राज्यात  विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल  मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार  केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिवीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सीजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशीपण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

आता संपर्क शोधणे कठीणः आपण सर्वसमावेशक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू. पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हातावर पोट असणाऱ्यांची चिंताः एकीकडे लसीकरण वाढवण्याची खूप गरज आहे. ब्रिटनने दोन आधीच महिने कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

…तर आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती होईलः सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरवले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीत मंत्र्यांनीही काही सूचना केल्या. त्या अशाः

अजित पवारः रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पाउले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबावा लागेल.

राजेश टोपेः प्रत्येक नगर परिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सीजनचा साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तत्काळ कार्यवाही करावी.

एकनाथ शिंदेः ऑक्सीजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा