‘हॅलो डॉक्टर’: राहुल गांधींनी सुरू केली हेल्पलाइन, वैद्यकीय सल्ल्यासाठी करा ‘या’ नंबरवर फोन

0
85

नवी दिल्लीः देशातील कोरोना संसर्गाची हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांसाठी ‘हॅलो डॉक्टर’ ही हेल्पलाइन सुरू केली आहे. राहुल गांधी यांनी हेल्पलाइन नंबरही जारी केला असून या क्रमांकावर फोन करून कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे.

भारताला एकोप्याने उभे राहण्याची आणि आपल्या लोकांना मदत करण्याची गरज आहे. आम्ही ‘हॅलो डॉक्टर’ ही वैद्यकीय सल्ला देणारी हेल्पलाइन सुरू केली आहे. कृपया +919983836838 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करा. असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या हेल्पलाइनमध्ये डॉक्टर तसेच मानसोपचारतज्ज्ञांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या हेल्पलाइनवर कॉल करून कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करता येणार आहे आणि वैद्यकीय सल्लाही घेता येणार आहे.

देशात २४ तासांत ४ लाखांहून अधिक रुग्ण, साडेतीन हजारांवर मृत्यूः दरम्यान, देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून आज सकाळी संपलेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्ण आढळणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. देशात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ९१ लाख ९६९ वर पोहोचली असून २ लाख ११ हजार ८५३ लोकांना जीव गमवावा लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा