१४ दिवस लॉकडाऊनची टास्क फोर्सची शिफारस, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री करणार घोषणा!

0
316

मुंबईः राज्यात गंभीर होत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी कोविड टास्क फोर्सशी चर्चा केली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन लावावा, अशी शिफारस कोविड टास्क फोर्सने केली असून या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सचिवांचीही बैठक घेऊन चर्चा केली. आता मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत राज्यात आलेली कोरोनाची मोठी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरच्या काळात करावयाच्या उपाययोजनांवर सांगोपांग चर्चा झाली. कोरोनाची संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही, असे टास्क फोर्सच्या बहुतांश सदस्यांचे मत होते. काही सदस्यांनी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसल्याचेही मत मांडले. मात्र बहुतांश सदस्य हे लॉकडाऊन लागू करण्याच्याच बाजूचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचाः घरीच बरे होऊ शकतात ९५ टक्के कोरोना रुग्ण, टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ टिप्स…

टास्क फोर्सच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विभागांच्या सचिवांचीही बैठक घेऊन चर्चा केली. पुढचे आणखी दोन दिवस मुख्यमंत्री हे विविध अर्थ मंत्रालयासह विविध विभागांशी चर्चा करणार आहेत, अशी माहितीही सूत्रांकडून मिळते. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याचे स्वरुप काय असेल हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, राज्यात लागू करावयाच्या कडक निर्बंधांबाबत सर्वसमावेशक एसओपी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचाः BigBreakingNews: कोरोनाचे संकट गंभीरः राज्यातील ११ जिल्ह्यांत नाही एकही बेड उपलब्ध!

टास्क फोर्सच्या या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली. राज्यात आता लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत चर्चा झाली. मात्र एकंदर लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टास्क फोर्सच्या बहुतांश सदस्यांचे मत होते, असे टोपे म्हणाले.

हेही वाचाः कडक निर्बंध की लॉकडाऊन?: सर्वसमावेशक एसओपी तयार करण्याचे काम सुरूः मुख्यमंत्री

 राज्यात विविध शहरात बेड्सची कमतरता भासू लागली असून रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय गत्यंतर नाही, असे टास्क फोर्सच्या सदस्यांचे म्हणणे होते. आता दोन दिवस विविध विभागांशी चर्चा होईल आणि मुख्यमंत्री बहुतेक बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर चौदा एप्रिल झाल्यानंतर मुख्यमंत्री याबाबतचा उचित निर्णय जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा