औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात, मनपा करतेय तिसऱ्या लाटेची तयारी

0
62

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना यश येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. यापुढेही कोरोना प्रतिबंधक कामातील सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधी सोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई शेळके, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, आ. उदयसिंह राजपूत, आ. हरीभाऊ बागडे यांच्यासह महानगर पालिक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून कोरोना बाधितांची संख्या देखील नियंत्रणात आणण्यात आली आहे. प्रशासनासह सर्व नागरिकांचा, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. यापुढील काळात ही अशीच शिस्त कायम ठेवल्यास कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीचा आपण नक्कीच सामना करु शकू. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सीजन साठा वाढविण्यात येत असून ऑक्सीजन उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण आदी ग्रामीण भागात ही ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी ६ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे काम सीएसआरमधून चालू  करण्यात आले आहे. या प्रकल्पातून एकूण ११ किलोलिटर  इतक्या ऑक्सीजन सिलिंडरची निर्मिती होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

खा. डॉ. कराड म्हणाले की शहरातील अतिरिक्त व्हेंटिलेटर चा उपयोग हा घाटीमधील व्हेटिंलेटर बेड वाढवण्याकरिता करावा, अशी सूचना यावेळी डॉ. कराड यांनी केली. दिवसेंदिवस रुग्णालयात आग लागण्याचे प्रमाण वाढत असून प्रत्येक रुग्णालयात नियमित आगप्रतिबंधात्मक उपाय योजनांची तपासणी करण्याचे खा. जलील यांनी सूचित केले.

कन्नड मध्ये एमडी फिजिशीयन डॉक्टर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ. उदयसिंह राजपूत यांनी केली. सीएसआर फंडातून घाटीला देण्यात आलेले व्हेंटिंलेटर कार्यान्वित करण्यात आले काॽ शहरात होत असलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनची  दुरुस्ती लवकरात लवकर करावी असे, असे आ. अतुल सावे म्हणाले. शहरात उपलब्ध असलेले व्हेंटीलेटर मराठवाड्याच्या बाहेर न देता आपल्या जिल्ह्याच्या गरजा पूर्ण करण्याची सूचना सर्व आमदारांनी यावेळी केली.

महापालिकेची तिसऱ्या लाटेची तयारीः शहरात दररोज ५००० टेस्टिंग होत असून शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील नियमित होत आहे. भविष्यातील तिसऱ्या लाटेकरिता प्रशासन तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून मनपा डॉक्टरांना आयसीयूमध्ये वापरात येणाऱ्या विविध यंत्राचा वापर कसा करावा याकरिता  घाटीमध्ये प्रशिक्षणाकरीता पाठवण्याचे नियोजन असल्याचे मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा