देशात कोरोना संसर्गाने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड, एका दिवसात १.१५ लाख नवे रूग्ण!

0
29

नवी दिल्लीः देशातील कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या विक्रमी वेगाने वाढत चालली आहे. आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एकाच दिवशी १ लाख १५ हजार ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांची ही आकडेवारी देशात कोरोना संसर्गाचा घातक ट्रेंड सेट होऊ लागल्याचे संकेत देणारी आहे. यापूर्वी रविवारी १ लाख ३ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते तर सोमवारी ९७ हजार रुग्ण आढले होते. म्हणजेच तीन दिवसाच्या फरकाने दुसऱ्यांदा देशात एक लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबतीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे दररोज ८० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दररोज आढळणाऱ्या ६० हजारांहून अधिक रुग्णसंख्येसह अमेरिका जगात तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे आतापर्यंत ३ कोटी १५ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तेथे १ कोटी ३१ लाख रुग्ण आढळले आहेत. याबाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून देशात आतापर्यंत १ कोटी २८ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 गेल्या चोवीस तासांत भारतात ६३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ६६ हजार २०८ वर पोहोचली आहे. देशात आढळणाऱ्या एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवशी ५५ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० हजार रुग्ण मुंबईत, ११ हजार पुण्यात, ४हजार ३०० नाशिकमध्ये तर ३ हजार ७०० रुग्ण नागपुरात आढळून आले आहेत.

राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. तेथे ५ हजार १०० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी दिल्लीत ३ हजार ५४८ आणि रविवारी ४ हजार ३३ रुग्ण आढळले होते. दिल्ली सरकारने रात्री १० वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. देशात सध्या ८ लाख ४३ हजार ७७९ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. सक्रीय कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

पुढचे चार आठवडे धोक्याचेः या दरम्यान, कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुढील चार आठवडे धोक्याचे असल्याचा इशारा केंद्री आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग मागील वर्षीच्या तुलनेत खूपच वेगाने पसरत चालला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लोकांनी मास्क घालण्यासारख्या उपायांना तिलांजली दिली आहे, असे वाटू लागले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांकडे लोकांनी केलेले दुर्लक्ष हेच कोरोनाचा संसर्ग एवढ्या प्रचंड वेगाने फैलावण्याचे कारण असल्याचेही हर्षवर्धन म्हणाले.

महाराष्ट्रातील स्थिती गंभीरः महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एवढ्या वेगाने वाढू लागली आहे की, रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यातील यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात शेजारच्या राज्यातून ऑक्सीजन पुरवठा करण्याची मागणी केली आहे. राज्यात गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सीजनचा तुटवडा भासत असून रुग्णसंख्येच्या तुलनेत भासणारी ऑक्सीजनची गरज पाहता शेजारच्या राज्यांना महाराष्ट्राला ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती टोपे यांनी हर्षवर्धन यांना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा