कोरोनाचे संकटः वाशिम, बुलडाण्यात संचारबंदी; औरंगाबादेत दोन दिवसांत २५७ रुग्ण

0
144
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः कोरोनाचे संकट ओसरू लागल्याची चिन्हे दिसू लागली असतानाच फेब्रुवारी महिना उजाडताच हे संकट अधिक गडद होताना दिसू लागले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वाशिम आणि बुलडाण्याच्या जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. दुसरीकडे औरंगाबादेत गेल्या दोनच दिवसांत तब्बल २५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे हा धोका वाढत असल्याचे दिसू लागले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी एकाच दिवशी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभात केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली असून रात्री १० वाजेपर्यंतची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली असून शिवजयंतीच्या मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत.

वाशिम जिल्ह्यातही बुधवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व प्रकारचे उत्सव, समारंभ, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा आणि बैठकांना ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत मिरवणुका काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे. गर्दीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असे आदेश वाशिमचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.

दुसरीकडे औरंगाबादेत गेल्या दोनच दिवसांत २५७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेत मंगळवारी १२० आणि बुधवारी १३७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित रूग्ण आढळण्याचे प्रमाण शहरी भागात अधिक आहे. सध्या औरंगाबादेत ४९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत औंरंगाबाद जिल्ह्यात ४७ हजार ९७९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून १ हजार २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंडः कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, सर्व शाळा विद्यालये,महाविद्यालये, बँक्वेट हॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिकस्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी ठिकाणांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा