लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार, राज्यातील आकडेवारी चिंता वाढवणारी

0
245
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः राज्यात गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून आज दिवसभरात राज्यात ५ हजार ४२७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, पुणे, ठाण्याबरोबरच नागपूर अमरावती, अकोला, यवतमाळसह विदर्भातील पाच जिल्ह्यांत बिकट परिस्थिती असून स्थानिक प्रशासनाने शाळा- महाविद्यालये बंद केली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्याचे सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

 आज राज्यात ५ हजार ४२७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८१ हजार ५२० वर पोहोचली आहे. आज ३८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृत रुग्णांचा आकडा आता ५१ हजार ६६९ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९५.५ टक्के आहे.तर मृत्यूदर २.४८ टक्के आहे. राज्यात आज २ हजार ५४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या २ लाख १६ हजार रुग्ण होमक्वारंटाइन असून ४० हजार ८५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बैठक झाली. कोरोना रुग्ण संख्या वाढत असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला द्या, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. अकोला, यवतमाळ आणि अमरावती या तीन जिल्ह्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबईत बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलूंड, चेंबूर, टिळकनगर आदी भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट ठरले आहेत.

 राज्यात रुग्णसंख्या वाढीच्या बाबतीत वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सायंकाळी ७ नंतर बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात येत्या रविवारी संपूर्ण दिवसभर जनता कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. विदर्भातील बुलडाण्यातही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मराठवाड्यात औरंगाबादेत आज १५० रुग्ण आढळून आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ९ वीपर्यंत शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा