आपले राजकारण होते, जीव जनतेचा जातो; जनतेच्या जीवाशी खेळू नकाः मुख्यमंत्री

0
53

मुंबईः राज्यात अनेकांनी मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलने केली.  ही घाई जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे. तुम्ही आंदोलने करा, आवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपले राजकारण होते आणि जीवन जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजप आणि मनसेला सुनावले.

 कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या रोखण्याच्या उपाययोजनांबाबत राज्य कोविड कृती दलाने आयोजित केलेल्या माझा डॉक्टर या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचीही उपस्थिती होती.

 राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना, याचा विचार सर्वांनी करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्हीही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचे होते पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर कोरोनाविरुद्ध करा, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आता सणावारांचे दिवस सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणावारानंतर, गणेशोत्सवानंतर कोरोनाची दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या आधीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनीही ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपला शत्रू अजून पूर्णपणे पराभूत झालेला नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. आज कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तिसरी लाट आलीच तर तिची घातकता कमी व्हावी, त्यामगचा हा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. राहूल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा