पुण्यात कोरोनाचे पाच रूग्ण, संपर्कात आलेल्यांच्या शोधासाठी पथकांची स्थापना

0
68
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकट सहवासितही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे.

पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आढळलेल्या कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत.

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत. दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या कोरोना बाधितांच्या सहवासात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा