कोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध

0
122
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कोरोनाचा फैलाव जगभर झपाट्याने होत असून महाराष्ट्रातही कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण येथे १४ मार्च ते १६ मार्च २०२० असे तीन दिवस चालणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित केली आहे.

पैठणच्या नाथषष्ठी यात्रेला राज्याच्या विविध भागांतून वारकरी मोठ्या संख्येने येतात. या यात्रेत सुमारे  तीन ते पाच लाख भाविक भाविक सहभागी होतात. एवढ्या गर्दीत जर कोरोनाचा संसर्ग झालेला रूग्ण आला तर त्याचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भिती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या यात्रेत जमणाऱ्या भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पैठण येथे आयोजित नाथषष्ठी यात्रेसाठी जाणाऱ्या  व्यक्ती आणि भाविकांना प्रतिबंध करणे प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक असल्याने ही यात्रा स्थगित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. मुंबई पोलिस कायदा १९९१ च्या कलम ४३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पैठणच्या नाथषष्ठी यात्रेस स्थगिती दिली आहे.

जगभरातील १०५ देशांत कोरोनाचा संसर्ग फैलावला असून त्यामुळे ३८१८ जणांचा मृत्यू झाला आहे. १,१०,०२९ हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे ४३ रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी  सुरक्षित अंतर रहावे म्हणून गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देशच केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ३ मार्च रोजी सर्व राज्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पैठणची नाथषष्ठी यात्रेला स्थगित केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा