राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस, मात्र डोजेसच्या उपलब्धतेअभावी लसीकरण लांबणार!

0
103

मुंबई/जालनाः येत्या १ मेपासून देशातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी या गटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल आणि या लसीकरणाचा भार राज्याच्या तिजोरीतून उचलण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. असे असले तरी लसींची उपलब्धताच नसल्यामुळे १ मेपासून होणारे लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवली आहे.

१८ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार लस पुरवणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या  वतीने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल. लसींसाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. स्वस्त आणि चांगली लस उपलब्ध व्हावी यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार आहेत, असे मलिक म्हणाले.

लसीकरणाचा महाराष्ट्रदिनाचा मुहूर्त हुकणारः सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असले तरी लसींची उपलब्धताच नसल्यामुळे  हे लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे बोलून दाखवली आहे. १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस मिळावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मात्र कोविशिल्ड लसीचे २० मेपर्यंत जेवढे उत्पादन होईल, तेवढ्या लसी केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केल्या जाणार आहेत, असे सीरमच्या अदर पुनावाला यांनी सांगितले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून राज्य सरकारची कोव्हॅक्सीनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकशी बोलणी सुरू आहे, असेही टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा