१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व भारतीयांना मिळणार लसः केंद्र सरकारचा निर्णय

0
65
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ४५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही जावडेकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशामध्ये चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत चार कोटी ८५ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा अधिक लोकांना लसीचा पहिला डोस तर ८५ लाख लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत, असे जावडेकर म्हणाले.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या साह्याने दोन निर्णय घेण्यात आले. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा निर्णय म्हणजे कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये चार ते आठ आठवड्यांचे अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात निर्माण केलेल्या दोन्ही कोरोना लसी उत्तम  परिणामकारक आहेत, असेही जावडेकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा