मेडिकलच्याही परीक्षा पुढे ढकलल्या!

0
74

मुंबईः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज ही घोषणा केली.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. परंतु राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन या परीक्षा आता जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रचंड वेग लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षांबाबत ७२ तासांत निर्णय घेण्याचे आश्वासन देशमुख यांनी सोमवारी दिले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वैद्यकीय परीक्षांबाबत निर्णय घेण्याची विनंती देशमुख यांना केली होती. जवळपास ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे, असे खा. सुळे यांनी म्हटले होते.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा ३० जूनपर्यंत चालणार होत्या. परंतु ही परीक्षा सुरू होण्याआधीच सुमारे ४५० विद्यार्थी कोरोनाबाधित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा