कोरोना लवकरच थर्ड स्टेजला पोहोचणार; मटन-चिकन बंदः जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फेक मेसेज

0
452

औरंगाबादः ‘लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचनाः चिकन- मटन बंद, शेजारी-पाजारी बंद, कोरोनासोबत फिरणे बंद… ब्रेड, पाव, बेकरी सामान बंद’ असा एक मेसेज कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे. आधी हा मेसेज ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी करण्यात आलेली सूचना म्हणून सोशल मीडियावर फिरवण्यात आला. त्यानंतर तो आता औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे व्हायरल करण्यात येत आहे. मात्र अशा कोणत्याही सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. हा मेसेज फेक आहे, असे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. तशीच ती ठाणे जिल्ह्यातही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिलवली, उल्हासनगरमध्ये २ जुलै ते १२ जुलैदरम्यान कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर औरंगाबादमध्ये १० जुलैनंतर जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. कोरोना संसर्गाची हीच परिस्थिती लक्षात घेता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल करण्यात येत आहे.

आधी हा मेसेज ‘ठाणे कलेक्टरकडून सूचना’ या नावाखाली सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यानंतर या मेसेजमधील फक्त ‘ठाणे’ हे नाव बदलून ‘औरंगाबाद’ करण्यात आले आणि मेसेजमध्ये शब्दाचाही बदल न करता तो औरंगाबाद जिल्ह्यातही व्हायरल करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये वृत्तपत्रे बंद करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नाहीत किंवा तसे अधिकृत वृत्तही प्रसिद्धीसाठी देण्यात आलेले नाही, असे औरंगाबादच्या जिल्हा माहिती कार्यालयाने स्पष्ट केले आहे. हा मेसेज कोणीही शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा