औरंगाबादेत कडकडीत लॉकडाऊनचा आज पहिला दिवस, सगळीकडे शुकशुकाट

0
98

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात २५ दिवसांचा अंशतः आणि आठवड्यातील प्रत्येक शनिवार-रविवारी पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कडकडीत लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी आज रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.

या कडकडीत लॉकडाऊमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. उद्या रविवारीही शहरात कडकडीत लॉकडाऊन लागू असणार आहे. औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गुरूवारी सर्वाधिक ९०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल शुक्रवारी ६१७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊनच्या रुपाने निर्बंध लादण्यात आले आहेत. कडकडीत लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कुणीही बाहेर फिरकताना दिसत नाही. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचा आढावा घेत आहेत. शनिवार आणि रविवार वीक एंडमुळे होणारी गर्दी आणि गर्दीतून फैलावणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा