कोरोनामुक्तीनंतर फंगल इन्फेक्शन: औरंगाबादेत १३ जणांचे डोळे काढले, २०१ जणांवर शस्त्रक्रिया

0
3349
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे  उभा देश हैराण असतानाच आता कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना उद्भवत असलेले आजारही समोर येऊ लागले आहेत. कोरोनामुक्त नागरिकांच्या शरीरात बुरशी जन्य जंतूंचा संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शन होऊ लागले आहे. हे इन्फेक्शन एवढे घातक आहे की त्यामुळे औरंगाबादेत २४ जणांचा मृत्यू झाला. १३ जणांचे डोळे काढावे लागले तर २०१ जणांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. औरंगाबाद महापालिकेने बोलावलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लागण झालेले रुग्ण वेळेची उपचार मिळाल्यामुळे बरे होऊन घरी जात आहेत. मात्र हे बरे झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर त्यापैकी काही जणांना बुरशी जन्य जंतू संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शनचा आजार जडू लागला आहे. अशा अनेक तक्रारी डॉक्टरांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनामुक्तीनंतर उद्भवणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर चर्चा करण्यात आली.

  औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत गेली. मात्र, विविध उपाययोजना आणि लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर काही नागरिकांमध्ये बुरशी (फंगल इन्फेक्शन) हा आजार आढळून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची नुकतीच बैठक घेण्यात आली.  या बैठकीत ही माहिती समोर आली आहे.

कोरोनामुक्त होऊ घरी गेलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजार आढळत आहे. अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा आजार उद्भवतो. हा आजार जीवघेणा ठरू शकतो. मात्र या आजाराचे वेळीच निदान होऊन उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. या आजारामुळे आतापर्यंत औरंगाबाद जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ जणांचे डोळे काढावे लागले आहेत तर ९६ जणांच्या जबड्यावर तर १०५ जणांवर सायनसची शस्त्रक्रिया करावी लागली आहे.

कोरोनामुक्तीनंतर या आजाराची लक्षणे दिसू लागल्यास औरंगाबाद महानगरपालिकेच्या कोविड हेल्पलाइन ८९३६३०६००७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

ही आहेत लक्षणेः 

  • या आजाराची सुरुवात नाकापासून होत असून टाळू, डोळे व नंतर मेंदूपर्यंत पसरतो.
  • नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा, नाक, टाळू (हार्ड पालट) येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना (जबडा) असह्य वेदना होणे.
  • डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळून येतात.
  • हा आजार होताना सुरुवातीला नाकापर्यंत मर्यादित (नाक व सायनसेस) असतो. त्यानंतर डोळ्यापर्यंत पसरत जातो. याकडे दुर्लक्ष झाले तर मेंदूपर्यंत पसरत जाऊन रुग्ण हा बेशुद्ध पडणे व त्यास अर्धांगवायू होणे असे प्रकार घडतात.

उपचार काय?: बुरशीजन्य आजार आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा. बुरशीरोधक औषधी (इंजेक्शन) (अ‍ॅम्फोटेरेसीन-बी, फोसॅकोनॅझोल) घ्यावे किंवा सर्जिकल उपचार करावेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या नाकात बिटाडीनचे ड्रॉप टाकावेत. अशी उपचाराची दिशा या बैठकीत ठरवण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा