कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे,आरोग्यमंत्री टोपेंची विद्यार्थ्यांना भावनिक साद

0
210

मुंबईः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी आता राज्यातील विद्यार्थी मित्रांना भावनिक साद घातली आहे. आधी तुम्ही तुमची काळजी घ्या. त्याचबरोबर आईवडिल, बहीण-भाऊ आणि शेजाऱ्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन करतानाच कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. मला करणार ना मदत? अशी भावनिक साद टोपे यांनी घातली आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या नावे टोपे यांनी एक पत्र ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, शाळा महाविद्यालये नुकतीच सुरू झाली आहेत आणि कोरोना वाढताना दिसतो आहे. कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही, असे टोपे यांनी या पत्रात म्हटले आहे.

तुमचे खेळण्याचे, बागडण्याचे, क्रिडांगणावर घाम गाळण्याचे हे वय आहे. परंतु गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमची काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या आईवडिल, बहीण-भाऊ तसेच शेजाऱ्यांची काळजी घ्या. आईवडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेरून आल्यावर त्यांनी हातपाय स्वच्छ धुतले का नाही ते पहा. बाहेर जाताना त्यांनी मास्क लावला की नाही ते पहा. सॅनिटायझर वापरले की नाही तेदेखील पहा. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात की नाही हे पहा. कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच त्यांना सरकारी दवाखान्यात घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असेही टोपे यांनी या पत्रात म्हटले आहे.

मित्रानो, आजचा विद्यार्थी व तरूण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरूणाचे शरीर सुदृढ, मन सकारात्मक व बुद्धी सतेज पाहिजे तरच त्याला योग्यवेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो. तर मग चला, मला करणार ना मदत? मला तुमची खात्री आहे. आपण ही लढाई नक्कीच जिंकणार, असे टोपे या पत्रात म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा