कोरोनावरील ‘जादुई’ आयुर्वेदिक औषधासाठी हजारो नागरिकांची गर्दी, कसे तयार केले औषध ते वाचा

0
808
screen shot from video

हैदराबादः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशभर कहर कायम असून दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली असतानाच आंध्र प्रदेशातील नेल्लौर जिल्ह्यातील एका गावातील वैद्याने कोरोनापासून हमखास मुक्ती देणारे चमत्कारिक आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा केला असून हे औषध घेण्यासाठी हजारो लोकांनी तोबा गर्दी झाली आहे. औषधासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे हे औषध मोफत दिले जात आहे. या औषधाची ख्याती वाऱ्यासारखी पसरल्याने आसपासच्या राज्यातील लोकही ते घेण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे आता या आयुर्वेदिक औषधाची परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार आयसीएमआर सदस्यांची विशेष टीम या गावात पोहोचली आहे.

आंध्र प्रदेशच्या नेल्लौर जिल्ह्यातील कृष्णापट्टणम येथील बी. आनंदैय्या यांनी हे कोरोनापासून ‘हमखास मुक्ती’ औषध तयार केले आहे. ‘कृष्णापट्टणम दवा’ नावाने पाहता पाहता हे औषध इतके लोकप्रिय झाले की दूरवरच्या गावातील लोक हे औषध घेण्यासाठी कृष्णापट्टणमला येत असून औषधासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे. हे औषध कोरोनापासून खात्रीशीर मुक्ती देते, असा दावा बी. आनंदैय्या यांनी केला असून त्यांच्या या दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांची तोबा गर्दी उसळली आहे. औषधासाठी लोकांच्या तीन तीन किलोमीटर रांगा लागल्या आहेत. औषधासाठी होत असलेली गर्दी पाहता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तातडीची बैठक घेतली आणि या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी आयसीएमआरची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार आयसीएमआरच्या सदस्यांची विशेष टीम नेल्लोरला दाखल झाली आहे. आयसीएमआरच्या तपासणीनंतर या औषधाचे लोकांना वाटप करण्याबाबतचा निर्णय सरकार घेईल, असे रेड्डी म्हणाले.

 आयुष विभागाच्या डॉक्टरांच्या एका पथकाने काही दिवसांपूर्वी कृष्णापट्टणमचा दौरा केला आणि औषधाबाबत विचारपूस केली होती. औषध तयार करण्याची प्रक्रिया, उपचार प्रक्रिया आणि त्यानंतरच्या प्रभावाचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची गरज आहे, असे या पथकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. हे औषध घेणाऱ्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत, असा दावाही या पथकाने अहवालात केला आहे. एका कोरोना रुग्णाच्या डोळ्यात औषधाचे दोन थेंब टाकल्यानंतर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर एका तासात ८३ वरून ९५ झाला. आम्ही रुग्णांशी चर्चाही केली, असेही या पथकाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे नैल्लोर जिल्ह्याचेच आहेत. त्यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरच्या महासंचालकांना या औषधाचे अध्ययन करण्याचे निर्देश दिले आहेत.

कसे तयार केले हे आयुर्वेदिक औषध?: आयुर्वेदाचार्य असल्याचा दावा करणारे बी. आनंदय्या गेल्या काही वर्षांपासून आयुर्वेदिक औषधे तयार करतात. त्यांनी कोरोनावर विकसित केलेले औषध खूपच लोकप्रिय झाले असून त्याला प्रचंड मागणी आहे. या औषधासाठी त्यांनी खजूर गुळ, काळे मिरे, आद्रक, तेजपत्ता, लवंग, जायफळ, मध, काळे जिरे, दालचिनी,हिरवा कापूर, रुईच्या फुलाच्या कळ्या, आंब्याची कोवळी पाने यांचा वापर केला आहे. हे सर्व पदार्थ एकत्र शिजवून त्याचा अर्क कोरोनावरील उपचारासाठी वापरला जात आहे.

गंभीर रुग्णासाठीही औषधः बी. आनंदय्या यांनी चार प्रकारात हे औषध तयार केले आहे. त्यांना इंग्रजी मुळाक्षराची नावे पी, एफ, एल आणि के अशी दिली आहे. पी हे औषध फुफ्फुसाच्या संसर्गासाठी, एफ औषध विषाक्त पदार्थ काढून टाकण्यासाठी, एल हे औषध यकृत सुदृढ करण्यासाठी के हे औषध कोरोनाचे गंभीर रुग्ण बरे करण्यासाठी असल्याचे आनंदय्या यांनी म्हटले आहे.

कोरोनावरील जादुई औषध घेण्यासाठी तीन किलो मीटरपर्यंत लागलेल्या लांबच लांब रांगा. पहा व्हिडीओ

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा