महाराष्ट्रात लॉकडाऊन नेमका केव्हा लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले उत्तर…

0
767
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  ओमीक्रॉन विषाणूबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात आज मध्यरात्रीपासून नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ओमीक्रॉनबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ कधी येईल, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ज्यावेळी महाराष्ट्रात दररोज ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीचा अनुभव पाहता राज्यात जेव्हा दररोज ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लागू करायचा, असे ठरले आहे. परंतु ओमीक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे ऑक्सिजन वापराच्या मर्यादेचा निकष ५०० मेट्रिक टनापर्यंत आणण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात दररोज ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता टोपे यांनी व्यक्त केली.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 महाराष्ट्रात आता दररोज १४०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी हे प्रमाण ६०० ते ७०० होते. महाराष्ट्रातील ओमीक्रॉनबाधितांची संख्या ८० वर पोहोचली आहे. आज हा आकडा कमी वाटत असला तरी जेव्हा ओमीक्रॉनबाधितांची संख्या हजारावर पोहोचेल, तेव्हा परिस्थिती खूपच अवघड होईल. कारण ओमीक्रॉनच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे, असे टोपे म्हणाले.

तिसरी लाट आलीच तर ती ओमीक्रॉनमुळे येईलः परदेशात ओमीक्रॉनबाधितांची संख्या एका दिवसात दुप्पट होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या निम्म्या असलेल्या फ्रान्समध्ये दिवसाला एक एक लाख ओमीक्रॉनबाधित रुग्ण सापडत आहेत. आपल्याकडेही ओमीक्रॉनचे बऱ्यापैकी रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमीक्रॉनमुळे आलेली असेल, असेही टोपे म्हणाले.

शाळा बंद करण्याचा निर्णय नाहीः आम्हाला निर्बंध लागू करण्याची इच्छा नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू झाल्याचा कोणीही चुकीची अर्थ काढू नये. हॉटेल, रेस्टॉरंट्स या ठिकाणी एकाचवेळी खूप गर्दी होऊ नये, इतकाच त्यामागचा उद्देश आहे. सध्या शाळा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असेही टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा