नाव कठोर निर्बंधांचे, प्रत्यक्षात राज्यात लॉकडाऊनची दुसरी आवृत्तीच!

0
109
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात वाढलेला कोरोना संसर्गाचा उद्रेक रोखून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये, मॉल्स ३० एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आजपासून रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी, दिवसभर जमावबंदी आणि शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन म्हणजेच टाळेबंदी असे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या सर्वांना नाव कठोर निर्बंधांचे देण्यात आले असले तरी विरोधी पक्षाची बोलती बंद करण्यासाठी राज्य सरकारने राज्यभर अंशतः टाळेबंदीच लागू केली आहे. यातून फक्त रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला कोणत्याही निर्बंधांशिवाय मुभा देण्यात आली आहे.

 राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विक्रमी उच्चांक गाठत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत चालला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या पंधरा दिवसांत राज्यातील रुग्णालये भरलेली असतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी मी लॉकडाऊन लागू करत नाही, तर लॉकडाऊनचा इशारा देत आहे, असेही म्हटले होते. वाढती रुग्णसंख्या आणि संसर्गाचा प्रचंड वेग या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लावायची की कठोर निर्बंध लागू करायचे याबाबत बरेच दिवस खल सुरू होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच उद्योग, व्यवसायासह अन्य घटकांशीही चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर रविवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा अनुभव लक्षात घेता राज्य सरकारने प्रत्यक्ष टाळेबंदी लागू केलेली नसली तरी लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध पाहता ही टाळेबंदीची दुसरी आवृत्तीच मानली जात आहे. हे सर्व निर्बंध आज रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांत म्हटले आहे.

दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदीः आजपासून ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा सकाळी ७ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यभर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात आता तीन शनिवार आणि रविवार शिल्लक आहेत. हे उर्वरित तीन शनिवार- रविवार संपूर्ण संचारबंदी आणि कडक टाळेबंदी असेल. या दोन दिवशी सबळ कारण किंवा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा, आरोग्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वस्तूंची वाहतूक करणारे, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, ई-कॉमर्स, शेतीशी संबंधित कामे आणि महापालिका- नगरपालिकेशी संबंधित कर्मचारी यांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंदः उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यावर खाद्यपदार्थ खाता येणार नाहीत. या गाड्यांवर तयार झालेले खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील.

आवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदः किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.

खासगी कार्यालये बंदः खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील. सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सरकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्रार्थनास्थळे दर्शनार्थीसाठी बंदः सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे  भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे लागणार आहे.

मनोरंजन, सलून्स बंदः मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले,  सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या  कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे लागणार आहे.

 राजकीय, धार्मिक सभांवर बंदीः सर्व प्रकारचे राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर लागू असलेली बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम राहील. निवडणुका होऊ घातलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना राजकीय सभा- कार्यक्रमांना परवानग्या देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांनाच उपस्थितीची परवानगी असेल.

सार्वजनिक वाहतुकीस परवानगीः  सर्वसामान्यांच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. रीक्षांमध्ये रीक्षाचालक आणि दोन प्रवासी, टॅक्सीत चालक आणि एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे, बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक असेल, अन्यथा ५०० रुपये दंड आकारला जाईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा