मोदी म्हणालेः लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणून पहा, राज्यांनी शक्यतो लॉकडाऊन टाळावाच!

0
86

नवी दिल्लीः आजच्या स्थितीत आम्हाला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचे आहे. सर्व राज्यांनीही लॉकडाऊनचा शेवटचा पर्याय म्हणूनच वापर करावा. अशी पावले उचला की लॉकडाऊनची गरजच पडणार नाही, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे.

 राज्य सरकारांनी मायक्रो कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोरोना नियमावलीचे पालन करवून घेतले पाहिजे. परंतु लॉकडाऊन लागू करावा लागू नये, हेही ध्यानात ठेवले पाहिजे. राज्य सरकारांनी लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणूनच पाहिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

 कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. परिस्थिती कठीण आहे. आव्हान मोठे आहे. परंतु त्यावरही मात केली जाईल. सर्वांनी मिळून कोरोनाशी लढायचे आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवायचे आहे, असे मोदी म्हणाले.

 मोदींनी तरूणांनाही आवाहन केले आहे. आपली सोसायटी, गल्ली, अपार्टमेंटमध्ये छोट्या छोट्या समित्या स्थापन करून कोरोना नियमावलीचे पालन करवून घेण्यासाठी मदत करा. तुम्ही जर असे केले तर सरकारांना कंटेनमेंट झोन तयार करण्याची गरज पडणार नाही, संचारबंदी लावण्याची आवश्यकता भासणार नाही आणि लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, असे मोदी म्हणाले.

जिथे आहेत तिथेच मजुरांना थांबवाः मजुरांमध्ये विश्वास निर्माण करा आणि ते जिथे आहेत, तिथेच त्यांना थांबायला सांगा. राज्यांनी दिलेला विश्वास त्यांच्यासाठी मोठी मदत ठरेल. मजूर ज्या शहरात आहेत, तिथेच त्यांना लसही दिली जाईल आणि त्यांचे कामही थांबणार नाही, असा विश्वास द्या, असे मोदींनी राज्यांना सांगितले.

 यावेळच्या कोरोना संकटात देशाच्या अनेक भागांत ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत वेगाने आणि संपूर्ण संवेदनशीलतेने काम केले जात आहे. प्रत्येक गरजूला ऑक्सीजन मिळावा, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्रे या सर्वांचा प्रयत्न सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा