राज्यात कडक लॉकडाऊन सुरूः अनेक जिल्ह्यांच्या सीमा सील, रिकामटेकड्यांवर धडक कारवाई!

0
630

मुंबईः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला आज रात्री ८ वाजेपासून सुरूवात झाली असून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी कठोरपणे केली जात असल्याचे चित्र अनेक जिल्ह्यांत पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे निष्कारण या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणाऱ्यांची पाचावर धारणा बसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा आज रात्रीपासूनच सील करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या सहा एन्ट्री पॉइंटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. राज्यांच्या सर्वच जिल्ह्यात अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या रिकामटेकड्या नागरिकांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. शहर परिसरातील व्यक्ती वस्तू खरेदीसाठी एक किलोमीटर अंतराबाहेरच्या परिसरात गेल्याचे आढळल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील लोकल, मेट्रो आणि मोनो रेलने प्रवास करण्यास सर्वसामान्य नागरिकांना मनाई आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकच या सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेऊ शकतील. लोकलची तिकिटे फक्त काऊंटरवरच मिळणार असून ओळखपत्र पाहूनच रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात आहेत.

नव्या नियमांनुसार थेट जिल्हाबंदी घालण्यात आली नसली तरी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक कारणासाठीच जाता येईल. एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यात जाईल, तेथे त्या व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.

बँकांच्या कामकाजातही बदलः नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बँकांच्या व्यवहारातही बदल करण्यात आला आहे. राज्यातील बँकांमध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच चेक क्लिअरन्सचे काम चालणार आहे. उद्या, शुक्रवारपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

एसटीच्या बसेस फक्त अत्यावश्यक सेवेसाठीचः एसटी बसेस जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरही सुरू राहणार आहेत. परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालवल्या जाणार आहेत. आता सरकारने ज्या काही गाईड लाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार एसटी बस अत्यावश्यक सेवासाठीच असतील. त्यामुळे एसटीची संख्या कमी होईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

दोन तासांत विवाह न आटोपल्यास ५० हजार रुपये दंडः विवाह समारंभ २५ व्यक्तींच्या उपस्थितीत फक्त एकाच हॉलमध्ये दोन तासामध्येच पूर्ण करावे लागतील. या नियमांचे भंग करणाऱ्या कोणत्याही कुटुंबाला, हॉल मालक/चालकास व इतर संबधितास ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.  असे समारंभ ज्या हॉलमध्ये होत असतील त्या जागेवर कोरोना संबंधीची अधिसूचना लागू असेपर्यंत बंदी घेण्यात येईल.

खासगी बस वाहतुकीवर निर्बंधः खाजगी बसेस वाहतुकदारांना शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. खाजगी बसेसद्वारा प्रवास करणारा प्रवासी शेवटच्या ठिकाणी उतरताच  प्रवाश्याच्या हातावर १४ दिवस गृहविलगीकरणाचा शिक्का मारला जाईल. हा शिक्का खाजगी बसेस वाहतुकदार यांनी स्वत: बनवून घ्यावा लागेल. सर्व प्रवाश्यांचे प्रवेशावेळी थर्मल स्क्रिनींग करण्यात यावे.  या दरम्यान एखादया प्रवाशास लक्षणे आढळल्यास, त्यास तात्काळ कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये पाठवण्यात येणार आहे.

सरकारी कार्यालयांत १५ टक्केच उपस्थितीः राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबधीत सर्व शासकीय कार्यालये फक्त १३ टक्के  अधिकारी/कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. तथापि, कोरोना संबधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे. 

राज्यात आज ६७ हजार नवे रुग्ण, ५६८ रुग्णांचा मृत्यूः राज्यात आज ६७ हजार १३ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत तर ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ६२ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत राज्यात एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण ६ लाख ९९ हजार ८५८ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.३४ टक्के झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा