भीती ठरली खरी!: पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराजांसह १९ जणांना कोरोनाची लागण

0
397
वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात झालेल्या गर्दीचे संग्रहित छायाचित्र.

वाशिमः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये महंत कबीरदास महाराज यांच्या कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अज्ञातवासात गेलेले वनमंत्री संजय राठोड यांनी दोनच दिवसांपूर्वी पोहरादेवीत मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले होते. गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन धुडकावून लावत राठोड यांच्या समर्थनार्थ प्रचंड मोठ्या संख्येने २३ फेब्रुवारीला ही गर्दी जमली होती. या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता ती भीती खरी ठरताना दिसू लागली आहे.

पोहरादेवीत जमलेल्या गर्दीची मुख्यमंत्री ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेशही दिले होते. त्यानुसार पोलिसांनी १० हजार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. येथे जमलेली गर्दी तांड्यावर परत पोहोचली आहे. त्यामुळे या परतलेल्या गर्दीत कोरोनाची लागण झालेले नेमके किती? अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा