राज्यात सर्वांना मोफत लस मिळणार की नाही?, महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री करणार घोषणाः अजितदादा

0
34

पुणेः केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिल्यानंतर ही लस सर्वांना मोफत मिळणार की नाही? अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना ही लस मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. मोफत लसीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत, असे पवार म्हणाले.

१८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राज्यात लसींचा तुटवडा आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला बसलेली खीळ या पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील सधन वर्गातील नागरिकांनी लस विकतच घ्यावी, असे आवाहन काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.राज्यातील गरीब आणि अतिगरिबांना ही लस मोफत देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचेही टोपे म्हणाले होते. त्यामुळे राज्यातील सर्वांना ही लस मोफत मिळणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ही माहिती दिली. मोफत लसीकरणाबाबत १ मे रोजी मुख्यमंत्री भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबाबत तेव्हाच सांगितले जाईल, असे पवार म्हणाले.

 रेमडेसिवीर, लसीसाठी जागतिक निविदाः रेमडेसिवीर आणि लसींची वाढती मागणी लक्षात घेता या दोन्हीच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी राज्यांनी जबाबदारी घ्यावी, असे केंद्राचे म्हणणे आहे. तर ही जबाबदारी केंद्रानेच घ्यावी, असे राज्यांचे म्हणणे आहे. पण टोलवाटोलवी करून चालणार नाही. आम्ही त्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे अजित पवार म्हणाले. १ मेपासून राज्यात लसीकरणाची तयारी सुरू आहे, असेही पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा