‘महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतोच, कोरोना विषाणूविरुद्ध एकवटून त्याला हरवूया!’

0
37
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना चाचण्या, लसीकरण, सुविधा उभारणी आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत आदी उपस्थित होते.

शिथिलता आली आणि कोरोना आक्राळ विक्राळ झालाः गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवसरात्र रुग्णसेवा करत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जम्बो कोविड सेंटर्स दत्त घ्याः कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन करतानाच या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांत आणतांनाच कोरोनाला हरवायचेच आणि यातील तुम्ही महत्वाचा दुवा आहात, असे मुख्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड हवाः कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयांचे योगदान मोठे आहे. आताच्या परिस्थितीत मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. राज्य शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे अतिरिक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवतानाच प्रत्येक जिल्ह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर जपून करावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्य शासनाने चाचण्यांवर, उपचारांच्या दरांवर नियंत्रण आणले आहे त्याचे पालन होणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही याची दक्षती खासगी रुग्णालयांनी घ्यावी. छोट्या शहरांसाठी ई आयसीयू उपयुक्त ठरणार असून त्याचा वापर वाढवण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

सेवानिवृत्त डॉक्टर्स, नर्सना पुन्हा सेवेत घ्याः  उपचाराच्या सुविधा वाढवताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. खासगी रुग्णालयांनी याकाळात आयसीयू बेड, ऑक्सीजन बेड यांचा विस्तार करावा. राज्यात २० ते २५ वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये आहेत. जेथे शक्य असेल तेथे तातडीने व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजन बेड विस्ताराचे काम हाती घेण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केली. याक्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट आणखी किती काळ राहील याचा अभ्यास करावा. छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचे दर नियंत्रणात असले पाहिजे. महानगरातील आणि छोट्या जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील दर भिन्न असले पाहिजे, असा मुद्दा देशमुख यांनी मांडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा