घरीच बरे होऊ शकतात ९५ टक्के कोरोना रुग्ण, टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ टिप्स…

0
849
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात  आलेली कोरोनाची लाट थोपवण्यासाठी सरकार विविध पर्यायांची चाचपणी करत असून ही लाट थोपवण्यासाठी लॉकडाऊन अथवा कडक निर्बंध लागू करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असतानाच वाढत्या रुग्णसंख्येला वेळेवर उपचार कसे द्यायचे? हा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर ९५ टक्के कोरोनाबाधित रुग्ण घरीच बरे होऊ शकतात, असे सांगत आज, रविवारी झालेल्या बैठकीत कोरोना टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

 राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या, कमी पडणारी रुग्णालये, बेड्स आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर-नर्सेसची कमतरता असे अनेक प्रश्न सरकारला भेडसावू लागले आहेत. त्यामुळेच सरकार आता कठोरपणे कोरनाची लाट थोपवण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. त्या तयारीचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत ऑनलाइन बैठक केली आणि सर्वच पैलूंवर सखोल चर्चा केली. या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील ११ ते १२ जिल्ह्यांत बेड्स उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती सादर केली.

 या एकूणच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने आज सरकारला काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. ९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांत विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. मुंबई महापालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, अशी महत्वाची सूचना टास्क फोर्सने केली आहे. म्हणजेच आता सामान्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल न करता सोसायट्यांमध्येच सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातच उपचार केले जाऊ शकतात.

सध्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की रुग्ण थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केला जातो. आता यापुढे तसे न करता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची आधी सहा मिनिटे चालण्याची चाचणी घ्यावी आणि नंतरच त्या रुग्णाबाबत डॉक्टरांनी निर्णय घ्यावा, अशी सूचनाही टास्क फोर्सने केली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भासत असलेली डॉक्टरांच्या तुटवड्याची समस्या दूर करण्यासाठीएमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा  मोठ्या प्रमाणावर  उपयोग करून  घेण्याची सूचनाही टास्क फोर्सने केली आहे. टास्क फोर्सच्या तीन महत्वाच्या टिप्समुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

जितक्या जास्त चाचण्या, तितका वाढू लागला पॉझिटिव्हीटी दरः ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले.  सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतो आहे. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. काल, शनिवारी रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख अॅन्टीजेन चाचण्या होत्या, असे व्यास म्हणाले. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सीजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदूरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे, अशी माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा