मोदी सरकारचा दुजाभावः महाराष्ट्रापेक्षा निम्म्या लोकसंख्येच्या गुजरातला लसीचे ८० लाख डोस!

0
86
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना महामारीच्या संकटातही मोदी सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना प्राभावित राज्य असताना आणि सर्वाधिक सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असतानाही मोदी सरकारने महाराष्ट्रापेक्षा निम्मी म्हणजेच अवघी ६ कोटी ५० लाख लोकसंख्या असलेल्या गुजरातला कोरोना लसीचे तब्बल ८० लाख डोस दिले आहेत तर. गुजरातपेक्षा दुप्पट म्हणजेच १२ कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला आतापर्यंत केवळ ८५ लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. संसर्गाचा वेग प्रचंड आहे. दररोज ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य आहे. ४५ टक्क्यांहून अधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्रात संसर्गाचा वेग मोठा आहे. १२ कोटी ३० लाख लोकसंख्येच्या महाराष्ट्रात सध्या ४ लाख ७३ हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. अशावेळी तीनच दिवस पुरेल इतका लसींचा साठा महाराष्ट्रात उपलब्ध आहे. काही पनवेलसह महापालिकांकडील लसींचा साठा संपल्याने त्यांनी लसीकरण थांबवलेही आहे. असे असतानाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे खोटे असल्याचे सांगत आहेत आणि महाराष्ट्रातील भाजप नेते त्यांची री ओढत आहेत.

महाराष्ट्रः प्राप्त आकडेवारीनुसार मोदी सरकारने १२ कोटी ३० लाख लोकसंख्या आणि  ४ लाख ७३ हजार सक्रीय कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला आतापर्यंत  कोरोना लसीचे ८५ लाख डोस दिले आहेत.

 गुजरातः मोदींचे राज्य असलेल्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी ५० लाख आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा निम्मी लोकसंख्या असलेल्या गुजरातला मोदी सरकारने कोरोना लसीचे ८० लाख डोस दिले आहेत. गुजरातमध्ये १७ हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

राजस्थानः राजस्थानची लोकसंख्याही महाराष्ट्रापेक्षा कमी म्हणजेच ८ कोटी १० लाख आहे. असे असतानाही मोदी सरकारने राजस्थानला कोरोना लसीच्या ७८ लाख डोसचा पुरवठा केला आहे. राजस्थानमध्ये १६ हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

उत्तर प्रदेशः भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशलाही मोदी सरकारने कोरोना लसीचे ७६ लाख डोस उपलब्ध करून दिले आहेत. या राज्यात सध्या १७ हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

आजचे लस वितरण असेः

मोदी सरकारकडून आज गुरूवारीही देशातील राज्यांना कोरोना लसींचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी उत्तर प्रदेशला ४४ लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ मध्यप्रदेशला ३३ लाख, हरियाणाला २४ लाख, कर्नाटकला २३ लाख आणि गुजरातला  कोरोना लसीचे १६ लाख डोस देण्यात आले आहेत. ही सर्व राज्ये भाजप शासित आहेत. महाराष्ट्राला मात्र आज ७.५ लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात भाजपविरोधी महाविकास आघाडीचे सरकार आहे.

सत्तेच्या लालसेपायी सुडाचे राजकारणः दरम्यान, सत्तेच्या लालसेपायी भाजप सुडाचे राजकारण करत आहे. आणि हे राजकारण लोकांच्या जीवावर उठत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जीएसटीचा परतावा असो की आपत्तीच्या काळात आर्थिक मदत असो किंवा मग कोरोना लसींचे वितरण. मोदी सरकारने कायमच महाराष्ट्राशी दुजाभाव केला आणि त्याला पुरेपुर साथ देण्याचे काम भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी केले, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा