सोमवारपासून पाच टप्प्यांत हटणार महाराष्ट्रातील निर्बंध, मध्यरात्री निघाले अनलॉकचे आदेश

0
824
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून निर्माण झालेल्या मोठ्या गोंधळानंतर अखेर राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. राज्यात सोमवारपासून अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाचा पॉझिटिव्ही दर आणि ऑक्सीजन बेड्सची उपलब्धता या निकषांवर त्या त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच टप्पे करण्यात आले आहेत.

दर गुरूवारी जाहीर होणार स्थितीः दर गुरूवारी आरोग्य विभागाकडून निश्चित निकषांनुसार परिस्थिती जाहीर केली जाईल. त्या आधारावरच कुठे निर्बंध कमी करायचे आणि कुठे वाढवायचे, याबाबतचा नवा आदेश जारी केला जाईल. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाईल.

या पाच गटांत असेल जिल्ह्यांची वर्गवारीः

पहिला गटः पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा यात समावेश असेल.

दुसरा गटः दुसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सीजन बेड्स भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश असेल. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार या जिल्ह्यांचा दुसऱ्या गटात समावेश आहे.

तिसरा गटः तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी दर आणि ४० टक्क्यांहून अधिक ऑक्सीजन बेड्स भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. बीड, अकोला, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चौथा गटः चौथ्या गटात ज्या जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांहून अधिक ऑक्सीजन बेड्स भरलेले असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा चौथ्या गटात समावेश करण्यात आला आहे.

पाचवा गटः पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर आणि ७५ टक्क्यांपेक्षा ऑक्सीजन बेड्स भरलेले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. वरील ४ टप्प्यांत नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या गटात करण्यात आला आहे.

कोणत्या गटात काय सुरू, काय बंद राहणार?:

पहिला गटः पहिल्या गटातील जिल्ह्यांत सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेही नियमित सुरू होतील. रेस्टॉरंट्स सुरू करण्याची परवानगी असेल. लोकल सेवा सुरू होईल मात्र परिस्थितीनुसार निर्बंध घालण्याची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मुभा असेल. शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती असेल. विविध खेळ, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन सर्व कार्यक्रमांना मुभा असेल. लग्न सोहळे, अंत्यविधी, बैठका, निवडणुका यावर कोणतेही निर्बंध नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर्सनाही उघडण्याची परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या गटातील जिल्ह्यांत जमावबंदी लागू राहणार नाही.

दुसरा गटः या गटात जे जिल्हे आहेत, तेथील सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्याची परवानगी असेल. रेस्टॉरंट्ससाठी ५० टक्के क्षमतेची मुभा. लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ देण्यात आली आहे. चित्रिकरण नियमित करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसन क्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी. अत्यंविधीसाठी कोणतेही बंधन नसेल. निवडणुका, बैठका यावरही कोणतेही निर्बंध नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक १०० क्षमेतेने सुरू होईल. मात्र, आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी आदेश लागू असेल.

तिसरा गटः या गटातील जिल्ह्यांत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी मात्र ही दुकाने बंद राहतील.

चौथा गटः चौथ्या गटातील जिल्ह्यांत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकारने पूर्णपणे बंद राहतील.

पाचवा गटः पाचव्या गटातील जिल्ह्यांत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी मेडिकलची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद राहतील. ३,४, ५ या गटातील जिल्ह्यांत इतर अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा