पहिल्याच दिवशी संचारबंदीचा हुर्रे, आता कडक लॉकडाऊनच्या हालचाली; दोन दिवसांत निर्णय

0
550

मुंबईः कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्रीपासून राज्यभरात संचारबंदी आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी राज्यभरातील रस्त्यांवरची वर्दळ काही कमी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणांवरची गर्दी आणि वाहनांची वर्दळ कायम असल्यामुळे आता राज्य सरकार कडक स्वरुपाचा लॉकडाऊन लागू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल. सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्रीही बंद केली जाऊ शकते, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

 राज्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा प्रचंड ताण पाहता राज्यात बुधवार, १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १ मेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. मात्र आज संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी आणि वाहनांची प्रचंड वर्दळ दिसून आली. दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेत लोक रस्त्यांवर गर्दी करत असल्याचे चित्र आज पहायला मिळाले. ही गर्दी कमी झाल्याशिवाय कोरोना संसर्गाची साखळी खंडित होणार नाही. राज्य सरकारने ही बाब अत्यंत गांभार्याने घेतली असून ही गर्दी कमी करण्यासाठी लॉकडाऊनचे पुढचे पाऊल टाकण्याचा विचार करत आहे. वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

संचारबंदी लागू असूनही गुरूवारी पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर अशा प्रमुख शहरांसह अन्य ठिकाणीही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोक आणि वाहनांची वर्दळ होती. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने आणि भाजी मार्केटमध्येही लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळेच कडक लॉकडाऊन लागू करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी येत्या दोन दिवसांत कठोर पावले टाकली जातील. पेट्रोलपंप सुरू राहतील मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल- डिझेलची विक्री केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. किराणा आणि भाजीपाल्याच्या दुकानांवरील गर्दी कमी करण्यासाठीही निर्बंध घातले जाऊ शकतात, असेही वडेट्टीवार म्हणाले.

निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाले आहे. आज संचारबंदीचा पहिला दिवस असल्याचे थोडी सवलत दिली. उद्या, शुक्रवारपासून मात्र अजिबात घराबाहेर पडू नका. उद्यापासून परिस्थिती पाहून जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद केली जातील. गर्दी कमी झाली नाही तर मुख्यमंत्री कठोर पावले उचलतील आणि एकदोन दिवसांत कडक लॉकडाऊनचे आदेश देतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात आज ६१ नवे रुग्ण, ३४९ मृत्यूः दरम्यान, गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल ६१ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या  ६ लाख २० हजार ६० सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दुसरीकडे आज दिवसभरात राज्यातील ५३ हजार ३३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३ टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा