राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?, उद्या सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णयाची शक्यता

0
628

मुंबईः कोरोना संसर्गाचा वाढता वेग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले असून राज्यातील परिस्थिती सुधारली नाही तर संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाऊन महत्वाचाच असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वडेट्टीवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या शनिवारी दुपारी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 राज्यात शनिवार- रविवार असा कडक वीकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर उर्वरित दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावरची गर्दी कमी होताना दिसत नाही आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही खाली यायला तयार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अशातच राज्य सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांना व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात असतानाच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाण्याचे स्पष्ट संकेतच वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

  राज्यात वीकेण्ड लॉकडाऊनची नितांत गरज होती. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता वीकेण्ड लॉकडाऊन पुरेसा नाही. राज्यातील रुग्णसंख्येचा आकडा पुढील १० दिवसांत १० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करावाच लागेल. त्यामुळे तीन आठवड्यांचा पूर्ण लॉकडाऊन करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. निरपराध लोकांचे जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.

 आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना टोपे म्हणाले की, आम्ही लॉकडाऊनच्या समर्थात नाही. परंतु जर परिस्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन महत्वाचा आहे. जेव्हा रुग्णालयांत गर्दी होते. डॉक्टरांची कमतरता भासू लागते. औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करणअयास आपण सक्षम नसतो तेव्हा तत्काळ लॉकडाऊन जाहीर करण्याचा नियम आहे, असेही टोपे म्हणाले.

उद्या शनिवारी होणार चर्चाः या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आठवड्यात राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी आहे. शनिवार १७ एप्रिल आणि रविवार १८ एप्रिल रोजी आधीच जाहीर केलेला वीकेण्ड लॉकडाऊन आहे. त्यामुळे या आठवड्यातील सोमवार १२ एप्रिल, गुरूवार १५ एप्रिल आणि शुक्रवार १६ एप्रिल असे तीनच दिवस शिल्लक रहात असल्यामुळे हा संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन लावता येईल का? याची चाचपणी मुख्यमंत्री ठाकरे या बैठकीत करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा