SSC Exam: इयत्ता दहावीची परीक्षा रद्द, कडक लॉकडाऊनचाही राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

0
258

मुंबईः राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य बोर्डामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. दरम्यान, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला असून त्याची मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. आता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करायचे याबाबत अद्याप कोणतेही धोरण निश्चित झालेले नाही. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून याबाबत अभ्यास करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, याबाबतचे धोरण ठरवले जाणार आहे.

मूल्यांकनाबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनाही विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत काही तज्ज्ञांशीही चर्चा केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा