केंद्राला फाटाः महाराष्ट्र करणार पदेशातून लसी आयात, ब्रिटनप्रमाणे राबवणार व्यापक लसीकरण!

1
4365

मुंबईः कोरोना प्रतिबंधक लसीच्या पुरवठ्यात केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्यात येत असल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने थेट परदेशातून कोरोना प्रतिबंधक लसींची आयात करण्याचा निर्णय घेतला असून या लसी आयात करून ब्रिटनच्या धर्तीवर व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्राने वारंवार मागणी करूनही मोदी सरकारकडून राज्याला गरजेइतक्या लसी देण्यात येत नाहीत, अशी महाराष्ट्राची तक्रार आहे. महाराष्ट्रापेक्षा निम्मी लोकसंख्या असलेल्या गुजरातला मोदी सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटींनी जास्त लसीचे डोस पुरवण्यात आल्याची आकडेवारी देत महाराष्ट्राने मोदी सरकारकडून केला जाणारा भेदभाव उघड केला आहे.

हेही वाचाः राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय, मुख्यमंत्री ठाकरे उद्या करणार औपचारिक घोषणा

आता केंद्र सरकारने राज्यांना थेट परदेशातून लसींची आयात करण्याची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार लसींच्या बाबतीत आता केंद्रातील मोदी सरकारवर विसंबून न राहता थेट परदेशातून लसींची आयात करणार आहे. त्यासाठी सर्व विभागांचा निधी लसींच्या आयातीसाठी वळवण्यात येणार आहे. लसी आयात करून ब्रिटनच्या धर्तीवर व्यापक प्रमाणात लसीकरण करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे.

हेही वाचाः SSC Exam: इयत्ता दहावीची परीक्षा रद्द, कडक लॉकडाऊनचाही राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. लोकांना लस उपलब्ध व्हावी म्हणून गरज भासल्याच आम्ही इतर सर्व विभागांच्या निधीत कपात करू, असे टोपे म्हणाले.

 गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची प्रचंड मोठी लाट आली होती. मात्र ब्रिटनने मोठ्या प्रमाणात लसीकरण केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम राबवण्याची राज्य सरकारची योजना आहे. राज्यात दररोज ७ लाख लोकांचे लसीकरण करण्याची राज्य सरकारची योजना आहे. मात्र केंद्र सरकारने लादलेले निर्बंध आणि केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा यामुळे केवळ तीन लाख लोकांचे दररोज लसीकरण करणे शक्य होत आहे, असे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचाः मोदी म्हणालेः लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणून पहा, राज्यांनी शक्यतो लॉकडाऊन टाळावाच!

आज ब्रिटनमधील ६० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे तेथे फारच कमी प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तेथील मृतांचा आकडाही एक आकडी आहे. ब्रिटनने संपूर्ण देशात तीन महिने लॉकडाऊन लागू केला आणि व्यापक प्रमाणात लसीकरण केले, असे टोपे म्हणाले.

 आम्ही सर्व विभागांच्या खर्चात कपात करून तो निधी लस खरेदीसाठी वळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही देशात निर्मिती केलेल्या दोनच (कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन) लसींवर अवलंबून राहणार नाही. स्पुटनिक व्ही, फायझर आणि मॉर्डनासारख्या लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. राज्य सरकारच्या लसीकरण मोहीमेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येईल. तर ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत केले जाईल, असेही टोपे म्हणाले.

 राज्यातील कोरोना संसर्गाच्या परिस्थीतीचा सामना करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधनांच्या खरेदीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही राज्य मंत्रिमंडळाने मुख्य सचिव, वित्त, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव यांना दिले आहेत, असे टोपे म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा