महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मिळणार परदेशातून आयात केलेली लस!

0
598

मुंबईः मोदी सरकारकडून महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात दुजाभाव करण्यात येत असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर लसींअभावी लसीकरण ठप्प होत आहे. त्यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आता थेट परदेशातूनच लसी आयात करण्याचा निर्णय घेतला असून या आयात केलेल्या लसीतून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे व्यापक प्रमाणात लसीकरण केले जाणार आहे.

मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परदेशातून लसींची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. लसी आयातीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून या आयात केलेल्या लसीद्वारे राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर केंद्र सरकारमार्फत पुरवठा करण्यात येत असलेल्या लसींद्वारे ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

परदेशातून लसी आयात करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आम्ही सर्व विभागांच्या खर्चात कपात करून तो निधी लस खरेदीसाठी वळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही देशात निर्मिती केलेल्या दोनच (कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन) लसींवर अवलंबून राहणार नाही. स्पुटनिक व्ही, फायझर आणि मॉर्डनासारख्या लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. राज्य सरकारच्या लसीकरण मोहीमेत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येईल. तर ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत केले जाईल, असेही टोपे म्हणाले.

ब्रिटनच्या धर्तीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची प्रचंड मोठी लाट आली होती. मात्र ब्रिटनने मोठ्या प्रमाणात लसीकरण केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम राबवण्याची राज्य सरकारची योजना आहे. राज्यात दररोज ७ लाख लोकांचे लसीकरण करण्याची राज्य सरकारची योजना आहे. मात्र केंद्र सरकारने लादलेले निर्बंध आणि केंद्राकडून होणारा लसींचा पुरवठा यामुळे केवळ तीन लाख लोकांचे दररोज लसीकरण करणे शक्य होत आहे, असे टोपे यांनी सांगितले.

आज ब्रिटनमधील ६० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे तेथे फारच कमी प्रमाणात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तेथील मृतांचा आकडाही एक आकडी आहे. ब्रिटनने संपूर्ण देशात तीन महिने लॉकडाऊन लागू केला आणि व्यापक प्रमाणात लसीकरण केले, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा