सोप्या शब्दांत समजून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोणत्या सेवा बंद आणि कोणत्या सेवा सुरू होणार

0
189
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्राने लागू केलेले निर्बंध पाच टप्प्यांत शिथील केले जाणार असून पहिल्या टप्प्यात समावेश असलेल्या १८ जिल्ह्यांत सोमवारपासून पूर्णतः अनलॉक केले जाणार आहे. उर्वरित जिल्ह्यांत काही निर्बंधांसह अनलॉकची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यांची विभागणी केल्यानुसार कोणत्या जिल्ह्यांत कोणत्या सेवा सुरू आणि कोणत्या सेवा बंद राहतील, हे सोप्या शब्दांत समजून घेऊ याः

कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेली ऑक्सीजन बेड्सची संख्या या निकषावर राज्य सरकारने अनलॉकसाठी पाच गट केले आहेत. पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सीजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असलेल्या जिल्ह्यांचा पहिल्या गटातील जिल्ह्यांत समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये  ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 या १८ जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार सोमवारपासून नियमितपणे सुरू होणार आहेत. या जिल्ह्यांत सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेही नियमित सुरू होतील. रेस्टॉरंट्स सुरू करण्याची परवानगी असेल. लोकल सेवा सुरू होईल मात्र परिस्थितीनुसार निर्बंध घालण्याची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला मुभा असेल.

शासकीय कार्यालयात १०० टक्के उपस्थिती असेल. विविध खेळ, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन सर्व कार्यक्रमांना मुभा असेल. लग्न सोहळे, अंत्यविधी, बैठका, निवडणुका यावर कोणतेही निर्बंध नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर्सनाही उघडण्याची परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल. या गटातील जिल्ह्यांत जमावबंदी लागू राहणार नाही.

 दुसऱ्या गटातील जिल्हेः मुंबई, मुंबई उपनगर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती, नंदूरबार

तिसऱ्या गटातील जिल्हेः सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, अकोला, कोल्हापूर, पालघर, उस्मानाबाद.

चौथ्या गटातील जिल्हेः पुणे, रायगड

पाचव्या गटातील जिल्हेः वरील चार गटांत समाविष्ट नसलेले सर्व जिल्हे

 कोणत्या जिल्ह्यात कोणत्या सेवा सुरू, कोणत्या सेवा बंदः

अत्यावश्यक सेवेतील दुकानेः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे उघडणार.
 • दुसरा गटः नेहमीप्रमाणे उघडणार.
 • तिसरा गटः दररोज दुपारी चार वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा.
 • चौथा गटः दररोज दुपारी चार वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा.
 • पाचवा गटः आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंत. शनिवार, रविवार बंद.

इतर सर्व प्रकारची दुकानेः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे सुरू करता येणार.
 • दुसरा गटः नेहमीप्रमाणे सुरू करता येणार.
 • तिसरा गटः आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी.
 • चौथा गटः बंद
 • पाचवा गटः बंद

जीम, सलून स्पाः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे सुरू करता येणार.
 • दुसरा गटः ५० टक्के क्षमतेने. अपॉंइंटमेंट घेऊन येणाऱ्या ग्राहकांनाच परवानगी.
 • तिसरा गटः सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने अपॉंइंटमेंट घेऊन येणाऱ्या ग्राहकांनाच परवानगी. एसी वापरास बंदी.
 • चौथा गटः चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने अपॉइंटमेंट घेऊन येणाऱ्या आणि लसीकरण झालेल्या ग्राहकांना परवानगी. एसी बंद.
 • पाचवा गटः बंद

लग्न समारंभः

 • पहिला गटः कोणतेही निर्बंध नाहीत.
 • दुसरा गटः हॉलच्या ५० टक्के क्षमतेने आणि जास्तीत जास्त १०० लोकांना परवानगी.
 • तिसरा गटः ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी.
 • चौथा गटः २५ लोकांच्या उपस्थितीला परवानगी.
 • पाचवा गटः केवळ कुटुंबासहित लग्न समारंभास परवानगी.

हॉटेलः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरू करता येणार.
 • दुसरा गटः ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी.
 • तिसरा गटः आठवड्यातील पाच दिवस दुपारी चार वाजेपर्यंत. त्यानंतर केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलिव्हरीला परवानगी.
 • चौथा गटः केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलिव्हरी.
 • पाचवा गटः केवळ पार्सल सुविधा आणि होम डिलिव्हरी.

सार्वजनिक वाहतूकः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे नियमित सुरू होणार.
 • दुसरा गटः १०० टक्के क्षमतेने परंतु उभ्याने प्रवासाला परवानगी नाही.
 • तिसरा गटः १०० टक्के क्षमेतने परंतु उभ्याने प्रवासाला परवानगी नाही.
 • चौथा गटः ५० टक्के क्षमतेने, उभ्याने प्रवासाला परवानगी नाही.
 • पाचवा गटः ५० टक्के क्षमतेने, उभ्याने प्रवासाला परवानगी नाही.

मॉल, चित्रपटगृहेः

 • पहिला गटः नियमित सुरू करता येणार.
 • दुसरा गटः ५० टक्के क्षमतेने.
 • तिसरा गटः बंद.
 • चौथा गटः बंद.
 • पाचवा गटः बंद.

ई कॉमर्सः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे सुरू.
 • दुसरा गटः नेहमीप्रमाणे सुरू.
 • तिसरा गटः नेहमीप्रमाणे सुरू.
 • चौथा गटः फक्त अत्यावश्यक सेवा.
 • पाचवा गटः फक्त अत्यावश्यक सेवा.

खासगी कार्यालयेः

 • पहिला गटः सर्व उघडता येणार.
 • दुसरा गटः सर्व उघडता येमार.
 • तिसरा गटः सर्व उघडता येणार, परंतु दुपारी चार वाजेपर्यंतच.
 • चौथा गटः निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रांशी संबंधित कार्यालयांना परवानगी.
 • पाचवा गटः निर्बंधांमधून वगळण्यात आलेल्या क्षेत्रांशी संबंधित कार्यालयांना परवानगी.

क्रीडाः

 • पहिला गटः नेहमीप्रमाणे परवानगी.
 • दुसरा गटः मैदानी खेळांना दिवसभर परवानगी. इंनडोअर खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत परवानगी.
 • तिसरा गटः केवळ मैदानी खेळांना सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.
 • चौथा गटः केवळ मैदानी खेळांना आठवड्यातून पाच दिवस सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी. शनिवार, रविवारी बंद.
 • पाचवा गटः बंद

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा